Jasprit Bumrah vs Usman Khawaja: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानात पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. पहिल्या दिवसाच्या खेळातील काही षटके शिल्लक असताना टीम इंडियाचा पहिला डाव १८५ धावांत आटोपल्यावर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात कमबॅक करण्याचे चॅलेंज घेऊन बुमराह अँण्ड कंपनी मैदानात उतरली. सर्वांच्या आशा पुन्हा एकदा बुमराहकडे लागून होत्या.
बुमराहनं कमी वेळात साधला पहिल्या विकेटचा डाव
बुमराहनंही गोलंदाजीला आल्यावर मिळालेल्या मोजक्या षटकात आपली भूमिका चोख बजावली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील तिसऱ्या आणि पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात भारतीय कर्णधाराने सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या रुपात ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का दिला. या विकेटसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.
सहाव्यांदा केली उस्मान ख्वाजाची शिकार; जड्डूच्या विक्रमाची बरोबरी
सिडनी कसोटी सामन्यात पहिली विकेट घेताच बुमराहनं आठ वर्षांपूर्वीच्या खास विक्रमाची पुनरावृत्ती केली. यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सहाव्यांदा त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवला. उसन्मान ख्वाजानं १० चेंडूत २ धावा केल्या. भारतीय गोलंदाजानं एका मालिकेत प्रतिस्पर्धी संघातील एकाच फलंदाजाला सहा वेळा बाद करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी रवींद्र जडेजाने ही कामगिरी केली होती. बुमराहनं त्याच्या विक्रमाशी बरोरी साधली आहे.
जडेजानं कुकसमोर मारला होता 'सिक्सर'
२०१६ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेत रवींद्र जडेजानं एलिस्टर कुकला एका मालिकेत सहावेळा आउट केले होते. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत बुमरा आणि उस्मान ख्वाजा आठ वेळा समोरासमोर आले. यात ११२ चेंडूचा सामना करताना ख्वाजानं फक्त ३३ धावा करत सहा वेळा बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटीत बुमराहकडे पुन्हा एकदा त्याची विकेट घेण्याची संधी असेल. या विकेटसह तो नवा रेकॉर्ड सेट करू शकतो.
ऑस्ट्रेलियान ९ धावांवर गमावली पहिली विकेट
भारतीय संघाचा डाव १८५ धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावातील खेळाला सुरुवात केली. ३ षटकात ९ धावा करून संघाने उस्मान ख्वाजाच्या रुपात पहिली विकेट गमावली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात पुन्हा एकदा टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांच्या बुमराहाच्या कामगिरीकडे नजरा असतील.