AUS vs IND Trending Topic : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. मालिकेत २-१ अशा आघाडीसह टीम इंडियाच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने अखेरच्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणाही केलीये. ऑस्ट्रेलियन संघानं स्टार ऑल राउंडरला बाकावर बसवत नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे दिसते. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसते. दुसरीकडे टीम इंडियात विजयाच्या दृष्टीनं सिडनीच्या मैदानात बदल दिसणार का? या चर्चेपेक्षा ड्रेसिंग रुममधील गॉसिपचा मुद्दा गाजतोय.
ऑस्ट्रेलियानं फ्लॉप स्टारला दाखवला बाहेरचा रस्ता
ऑस्ट्रेलियन संघानं सिडनी कसोटीआधी एक मोठा अन् धाडसी निर्णय घेतला आहे. अनुभवी मिचेल मार्शला बाहेरचा रस्ता दाखवत त्यांनी ३१ वर्षीय ऑलराउंडर ब्यू वेबस्टर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. तो पदार्पणाचा सामना खेळताना दिसेल. ब्यू वेबस्टर (Beau Webster) याची दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागली होती. मिचेल मार्श (Mitchell Marsh) च्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर त्याला बॅकअप खेळाडूच्या रुपात संघात स्थान देण्यात आले होते. पण मिचेल मार्श दुखापतही किरकोळ निघाल्यावर त्यालाच पहिल्या चार कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. ४ कसोटी सामन्यातील ७ डावात ७३ धावा आणि ३ विकेट्स या कामगिरीनंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
तो रोहित शर्मापेक्षा बरा खेळला, पण ऑस्ट्रेलियानं त्याचा लाड नाही केला
भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार बॅटर रोहित शर्माच्या तुलनेत मिचेल मार्शची बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कामगिरी ही कित्येक पटीनं चांगली आहे. रोहितनं ३ सामन्यातील ५ डावात फक्त ३१ धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं चार कसोटी सामन्यात ३० विकेट्सचा आकडा गाठला. या आकड्यापेक्षा रोहितच्या आकडेवारीत एक धाव अधिक आहे. यावरूनही त्याला ट्रोल करण्यात येत आहे. त्याला बाहेर बसवणार का? या आशयाचा प्रश्नही सिडनी कसोटीआधी कोच गंभीरला विचारण्यात आला होता. यावरुन रोहितला बाकावर बसवण्यात येईल, वैगेरे चर्चा सुरु आहे. पण खरंच त्याला बाहेर बसवण्याचा धाडसी निर्णय टीम इंडिया घेऊ शकेल का? हे गंभीरच्या रिप्लायप्रमाणेच संभ्रमित करणार आहे.
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वाद अन् त्यावर रंगलेली चर्चा
भारतीय संघाच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये कोच अन् खेळाडू यांच्यातील सर्वकाही ठीक नाही, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. याप्रकरणावर गौतम गंभीरनं ड्रेसिंग रुममधील गोष्टी तेवढ्यापुरत्या मर्यादीत असायला हव्यात, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर यावेळी त्याने रोहित-विराटसोबत काय संवाद झाला या प्रश्नावरही उत्तर दिले. सिडनी कसोटीत कशी जिंकता येईल याव्यतिरिक्त आमच्यात दुसरा कोणत्याही मुद्यावर चर्चा झालेली नाही, असे तो म्हणाला. थोडक्यात, सिडनी कसोटी आधी एका बाजूला ऑस्ट्रेलियाचा धाडसी निर्णय तर दुसऱ्या बाजुला टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात उलट सुलट गोष्टींची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.