Virat Kohli Clown Row Indian Legend Sunil Gavaskar And Irfan Pathan Slams Australian Media : एका बाजूला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मैदानात लढत रंगली असताना ऑस्ट्रेलिया मीडियाच्या भूमिकेनं मैदानाबाहेर एक वेगळं युद्ध रंगलं आहे. ज्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या सुरुवातीला ज्या मीडियानं कोहलीच दाबात स्वागत केलं होते त्यांनी मेलबर्न कसोटी सामन्यातील सॅम कॉन्स्टास वर्सेस विराट कोहली प्रकरणानंतर भारताच्या स्टार बॅटरचा अपमान केला आहे. याच प्रकरणावरुन भारताचे दिग्गज क्रिकेटर्संनी ऑस्ट्रेलियन मीडियाची शाळा घेतलीये. लिटल मास्टर सुनील गावसकर आणि इरफान पठाण या माजी क्रिकेटर्संनी ऑस्ट्रेलियन मीडियाची लायकी काढत किंग कोहलीसंदर्भात ऑस्ट्रेलियन मीडियानं छापून आलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सॅम कॉन्स्टास आणि विराट कोहली यांच्यातील वादग्रस्त घटना पाहायला मिळाली. फिल्डवर ऑस्ट्रेलियाच्या युवा बॅटरला खांद्यानं धक्का मारल्याप्रकरणी आयसीसीने विराट कोहलीला शिक्षाही दिली. मॅच फीच्या २० टक्के रक्क्कम कपातीसह एक डेमेरिट पॉइंट विराट कोहलीच्या खात्यात जमा झाला. पण यावर ऑस्ट्रेलिया मीडिया समाधानी नाही. कोहलीला यापेक्षा अधिक शिक्षा म्हणजे एका मॅचची बंदी घालायला पाहिजे होती, अशी काहीशी भूमिका ऑस्ट्रेलियन मीडियानं घेतल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर या प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीसंदर्भात अपमानजनक शब्दांचा प्रयोगही केला.
विराटसंदर्भात ऑस्ट्रेलियन मीडियानं असं काय छापलं?
ICC नं दिलेल्या निर्यावर आक्षेप व्यक्त करताना ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीचा उल्लेख हा 'जोकर' असा केला. एवढेच नाही तर कोहली रडवा असल्याचा शब्द प्रयोगही करण्यात आला. यावरून सुनील गावसकर आणि इरफान पठाण यांनी ऑस्ट्रेलियाची लायकी काढली आहे.
मार्केटिंगसाठी कोहलीचा वापर; इरफान पठाणनं मांडला ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा लेखाजोखा
स्टार स्पोर्ट्सवरील ब्रेक टाइममधील शोमध्ये इरफान पठाण म्हणाला की, "पहिली गोष्ट ही की, ऑस्ट्रेलियन मीडिया दुटप्पी वागत आहे. पहिल्यांदा ते कोहलीला राजाचा ताज देतात अन् आता मर्यादा पार करून त्याच्या विषयी असे लिहिले जाते. क्रिकेटरच्या लोकप्रियतेचा वापर करून पैसे कमावण्याचा त्यांचा हेतू दिसतो. कोणताही भारतीय ही गोष्ट खपवून घेणार नाही, अशा शब्दांत इरफान पठाणनं ऑस्ट्रेलियन मीडियावर राग व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रामनरेश सरवनसोबत काय केले होते? त्याच्यासमोर कुटुंबियांना शिवीगाळ झाली ते आठवतं नाही का? यासह रिकी पॉन्टिंगनं भज्जीला धक्का मारल्याचा प्रकारासह अन्य काही उदाहरणं देत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची मैदानातील वृत्ती काय आहे, त्यावरही जोर दिला.
काय म्हणाले सुनील गावसकर?
ऑस्ट्रेलियन संघासाठी लोकल मीडिया नेहमीच बाराव्या खेळाडूची भूमिका निभावताना पाहिले आहे. त्यांना आपण कलेल्या गोष्टी खपतात पण दुसऱ्यांच्या गोष्टी खूपतात, अशा आशयाचा टोलाही गावसकरांनी हाणला. या दोघांनीही विराट कोहलीचं वागणं चूक होतं ही गोष्टही स्पष्ट केली. पण ऑस्ट्रेलिया मीडियानं जो प्रकार केलाय तो खपवून घेतला जाणार नाही. भारतीय चाहत्यांनी आणि मीडियानंही आपली ठाम भूमिका बजावली पाहिजे. ऑस्ट्रेलियाची चाल समजून घ्यायला हवी, असेही गावसकर यावेळी म्हणाले.