Australia vs India, 3rd Test, Changes Session Timings Of Match After Rain Washout On Day 1 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर नॅथन मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा यांनी नव्या चेंडूवर संयमी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या दिवसाच्या खेळात ८० चेंडूचा खेळ, ऑस्ट्रेलियानं केल्या बिन बाद २८ धावा
विकेट न मिळाल्यामुळे भारतीय संघाचा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा डाव थोडा फसलाच, असे म्हणावे लागेल. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने धावफलकावर २८ धावा लावल्या होत्या. नॅथन मॅकस्विनी ३३ चेंडूचा सामना करून ४ धावांवर तर उस्मान ख्वाजा ४७ चेंडूत १९ धावांवर खेळत होते. पहिल्या दिवसाचा बहुंताश खेळ पाण्यात गेल्यामुळं याची भरपाई करण्यासाठी आता उर्वरित चार दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ होणार आहे.
पावसाच्या बॅटिंगमुळे बदलली वेळ!
पहिल्या दिवसाचा खेळ हा भारतीय प्रमाण वेळेनुसार, ५ वाजून ५० मिनिटांनी सुरु झाला होता. आता दुसऱ्या दिवशीपासून अधिक षटकांचा खेळ व्हावा, यासाठी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनीची सामन्याला सुरुवात होईल. अखेरच्या सत्रातील शेवटचा चेंडू टाकण्याची वेळ ही दुपारी १२ वाजून ५० मिनिटे अशी करण्यात आली असून हा वेळही अर्धा तास वाढवला जाऊ शकतो.
दिवसभरातील तीन सत्रातील वेळापत्रक
- पहिले सत्र- सकाळी ५ वाजून २० मिनिटे ते सकाळी ७ वाजून ५० मिनिटे
- दुसरे सत्र- सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते सकाळी १० वाजून ३० मिनिटे
- तिसरे सत्र- सकाळी १० वाजून ५० मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटे.
(दिवसभरातील नियोजित ९८ षटकांचा कोटा पूर्ण झाला नाही तर सामना दुपारी १ वाजून २० मिनिटांपर्यंतच्या अतिरिक्त वेळेपर्यंत सुरु ठेवला जाईल)