India vs Australia Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिके खेळवली जात आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघांतील मालिका १-१ अशी बरोरीत आहे. उर्वरित ३ सामन्यात मालिका निकाली लागणार की, शेवटीही बरोबरीचा सीन पाहायला मिळणार त्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोण पुढे जाणार याचे गणित अवलंबून असेल. या दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. पण या सामन्याआधीच चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाची सर्व तिकीट विकली गेली आहेत.
तिसऱ्या कसोटी आधीच चाहत्यांमध्ये चौथ्या कसोटी सामन्याची क्रेझ
एका बाजूला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ डिसेंबर पासून रंगणाऱ्या ब्रिस्बेन कसोटी सामन्याची चर्चा रंगत असताना क्रिकेट चाहत्यांमध्ये मेलबर्नच्या मैदानात रंगणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीची क्रेज दिसून येत आहे. कारण या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाची सर्व तिकीट विक्रीला निघताच खपली आहेत.
कधी अन् कुठं रंगणार बॉक्सिंग डे कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. २६ डिसेंबरला या सामन्याची सुरुवात होईल. ख्रिसमसचा सण आणि त्याला जोडून आलेली सुटी यामुळे क्रिकेट चाहत्यांनी बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवसाच्या खेळाला जाऊन आनंद द्विगुणीत करण्याला पसंती दिल्याचे दिसते.
अॅडिलेड कसोटीत प्रेक्षकांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड
याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत विक्रम रचला होता. दिवस रात्र कसोटी सामन्यात अडीच दिवसात १ लाख ३५ हजार १२ प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावली होती. याआधी २०१४-१५ मध्ये या मैदानात पाच दिवसांच्या खेळात १ लाख १३ हजार ९ प्रेक्षकांनी स्टेडियमवर उपस्थिती दर्शवत सामन्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते.