बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाला पराभूत करत मालिका ३-१ अशी आपल्या नावे केली. सिडनीच्या मैदानातील विजयासह ऑस्ट्रेलियानं या BGT स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्धच्या पराभवाची १० वर्षांची मालिका खंडीत करण्यात यश मिळवले. पाचव्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी १२ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. यजमान संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत सामन्यासह मालिका जिंकली. स्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर कोच गौतम गंभीर याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने संघातील दिग्गज खेळाडूंपासून ते युवा खेळाडूंपर्यंत प्रत्येकाला एक खास सल्ला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाला कोच?
सिडनी कसोटी सामन्यातील पराभवासह टीम इंडियाने मालिका गमावल्यावर गौतम गंभीर म्हणाला की, प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हायला हवे असे वाटते. जर रेड बॉल क्रिकेटशी कनेक्ट राहायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा सल्ला कोच गौतम गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना दिलाय. त्याचा हा सल्ला कितीजण ऐकणार? ही गोष्ट फॉलो न करणाऱ्या खेळाडूसंदर्भात बीसीसीआय काय निर्णय घेणार तो पाहण्याजोगे असेल.
सर्वांना समान न्याय
माझं काम संघातील प्रत्येकासोबत एकसारखे वागणं आहे. एक दोन खेळाडूंसोबत चांगल वागायचं आणि अन्य खेळाडूंसोबत वेगळं अस वागणं असं करून मी माझ्या कामाला न्याय देऊ शकत नाही. संघातील सिनीयर खेळाडू असो किंवा पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला खेळाडू सर्वांसोबतचा व्यवहार हा सारखाच आहे, असे म्हणत त्याने संघातील ड्रेसिंग रूममधील वातावरण संतुलित राखण्यासाठी प्रयत्नशील आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. कोहली-रोहितच्या निवृत्तीवरही विचारण्यात आला होता प्रश्न
गंभीरला यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यासंदर्भात बोलणार नाही. ही गोष्ट खेळाडूला क्रिकेटची किती भूक आहे, त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला आपली भूमिका माहिती आहे. ते आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करतील, अशी आशा आहे.