ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज ॲलन बॉर्डर आणि भारताचे महान कसोटीपटू सुनील गावसकर यांच्या सन्मानार्थ भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळवली जाते. मागील दहा वर्षांत ऑस्ट्रेलियासह मायदेशात भारतीय संघानं ही स्पर्धा गाजवली. पण यावेळी टीम इंडियाला शह देत अखेर ऑस्ट्रेलियनं संघानं बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी सामना जिंकत मालिका ३-१ अशी आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सला ही प्रतिष्ठित ट्रॉफी देण्यासाठी फक्त फक्त ॲलन यांना बोलवण्यात आले. सुनील गावसकर तिथेच असताना त्यांना या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलवण्यात आले नाही. ही गोष्ट अनेकांना खटकणारी आहे. गावसकरांनीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या भूमिकवर नाराजी व्यक्त केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हे चित्र पाहायला मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही
सिडनी कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन संघानं ६ विकेट्स राखून सामन्यासह मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज एलन बॉर्डर यांनी विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला ट्रॉफी दिली. पण हे चित्र काही पहिल्यांदा पाहायला मिळालेले नाही. २०१८-१९ मध्ये एलन बॉर्डर यांनीच विजेत्या भारतीय संघालाही ट्रॉफी प्रदान केली होती. २०२०-२१ च्या हंगामात कोरोनाच्या काळात अजिंक्य रहाणेनं एकट्यानेच ही ट्रॉफी उंचावल्याचे पाहायला मिळाले होते. २०२२-२३ च्या हंगामात सुनील गावसकरांच्या हस्ते रोहित शर्मानं ट्रॉफी स्विकारली होती.
गावसकरांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात यासंदर्भात मतही व्यक्त केले. मला बक्षीस वितरण समारोहात सहभागी व्हायला आवडले असते. कारण ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील खास स्पर्धा आहे. मी मैदानातच होतो. ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला देताना मला वाइट वाटले नसते. त्यांनी चांगला खेळ केला त्यामुळे त्यांनी ती मिळवली. ठिकेय, पण माझ्या चांगल्या मित्रासोबत ऑस्ट्रेलियन संघाला ट्रॉफी प्रदान करायला आवडले असते, असे ते म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत १९९६-९७ पासून बॉर्डर गावसकर यांच्या नावाने विजेत्याला ट्रॉफी दिली जाते. आतापर्यंत भारतीय संघाने चार वेळा ही ट्रॉफी उंचावली आहे.