भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानात रंगणार आहे. पर्थ कसोटी सामन्यातील दमदार विजयानंतर भारतीय संघ पिंक बॉल टेस्टमध्ये बेस्ट कामगिरी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ॲडलेडला जाण्याआधी भारतीय संघ कॅनबेराला पोहचला आहे.
BCCI नं शेअर केला टीम इंडियाचा खास व्हिडिओ
बीसीसीआयने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास व्हिडिओही शेअऱ केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर दुसरी टेस्ट ॲडलेडच्या मैदानात आहे तर मग त्या आधी टीम इंडिया कॅनबेरात काय करतीये? असा प्रश्न पडू शकतो. जाणून घेऊयात टीम इंडियाच्या ॲडलेड व्हाया कॅनबेरा अशा प्रवासामागची स्टोरी
दुसरी टेस्ट मॅच ॲडलेडमध्ये मग कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया?
बीसीसीआयने शेअर केलेल्या जवळपास एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि संघातील अन्य खेळाडूंडी खास झलक पाहायला मिळते. टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानात असला तरी पिंक बॉल कसोटीआधी टीम इंडिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे ॲडलेडला जाण्याचा टीम इंडियाचा मार्ग व्हाया कॅनबेरा असा आहे.
एक नजर पिंक बॉल टेस्टमधील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या कामगिरीवर
पिंक बॉल कसोटीआधी भारतीय संघातील कोण कोणते खेळाडू सराव मॅचमध्ये खेळताना दिसणार ते पाहण्याजोगे असेल. भारतीय संघाचा पिंक बॉल टेस्टमधील रेकॉर्ड उत्तम आहे. दिवस रात्र कसोटी सामन्यातील ४ पैकी भारतीय संघाने ३ सामने जिंकले आहेत. जो एकमेव सामना गमावला आहे तो सामना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. एवढेच नाही तर ॲडलेडच्या मैदानात टीम इंडियावर ३६ धावांवर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली होती. या पराभवानंतर टीम इंडियाने मालिका जिंकून दाखवली होती. कांगारुंच्या संघाने आतापर्यंत १२ डे नाईट टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. यात ११ सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे.