AUS vs IND, Border Gavaskar Trophy : घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत सुपडा साफ झालेल्या टीम इंडियाचा आता ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कस लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल खेळण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात दिमाखदार अन् ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियातील दोन खेळाडूंना तात्काळ ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियातील अन्य खेळाडूंच्या आधी हे दोन खेळाडू ऑस्ट्रेलियाला होतील रवाना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लोकेश राहुल आणि ध्रुव जुरेल हे दोन खेळाडू टीम इंडियातील अन्य सदस्यांच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचणार आहेत.भारत 'अ' संघ आधीच ऑस्ट्रेलियात आहे. या संघाला ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या अनपौचारिक कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आता लोकेश राहुल आणि ध्रुव जुरेल हे दोघे या संघाला जॉईन होतील. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी रंगणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी मॅच प्रॅक्टिस व्हावी, या हेतून या दोघांना भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
KL राहुल अन् जुरेल कधी पोहचतील पोहचणार
भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दुसरा चार दिवशीय कसोटी सामना गुरुवारी ७ नोव्हेंबरापूसन रंगणार आहे. या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याच्या हेतून मंगळवारीच दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहचतील, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. लोकेश राहुल हा बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण या सामन्यात तो अपयशी ठरला होता.त्यानंतर दोन सामन्यात त्याला बाकावरच बसावे लागले. दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅकअप विकेट किपरच्या रुपात ध्रुव जुरेल टीम इंडियाचा भाग होता. पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर आल्यावर तो विकेट मागे दिसला होता.