Join us

कोण आहे Tanush Kotian? ज्याची अश्विनच्या रिप्लेसमेंटच्या रुपात झालीये टीम इंडियात एन्ट्री

इथं आपण जाणून घेऊयात कोण तनुष कोटियन?  कशी आहे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:23 IST

Open in App

Who Is Tanush Kotian India called up Mumbai Bowling Allrounder As Ashwin's Replacement : भारतीय संघ सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर. अश्विन याने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यावर उर्वरित दोन सामन्याआधी BCCI नं संघाच्या बाबतीत  एक मोठा आणि सरप्राइज देणारा निर्णय घेतला आहे.

तनुष कोटियन (Tanush Kotian) या अनकॅप्ड भारतीय खेळाडूला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तो ब्रिस्बेन कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या रविचंद्रन अश्विनची जागा घेईल. इथं आपण जाणून घेऊयात कोण तनुष कोटियन?  कशी आहे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी यासंदर्भातील सविस्तर माहिती

अंडर १९ मध्ये रियान अन् अर्शदीपसोबत खेळलाय हा अष्टपैलू खेळाडू 

उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱा हा खेळाडू एक बॉलिंग ऑल राउंडर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरीसह त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केलीये. तनुष कोटियन हा २०१७ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. रियान पराग आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत तो अंडर १९ आशिया कप स्पर्धाही खेळला आहे. या स्पर्धेत तो फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता. परिणामी २०१८ च्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संघात स्थान मिळाले नाही. ही संधी गमावल्यावर BCCI अंतर्गत रंगणाऱ्या विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेत त्याने आपल्या कामगिरीतील धमक दाखवून देत मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले.

 वयाच्या २० व्या वर्षी मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एन्ट्री

 तनुष कोटियन याने २०१८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी मुंबई संघाकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. सौराष्ट्र विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने दोन विकेट्स मिळवल्या होत्या. आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या ३३ सामन्यात २५.७० च्या सरासरीसह १०१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

रणजी स्पर्धेत केली हवा, मुंबईला चॅम्पियन करण्यात उचलला मोलाचा वाटा

 मुंबईला पुन्हा रणजीचा ताज मिळवून देण्यात या ऑल राउंडर खेळाडूनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. बॉलिंगशिवाय त्याने बॅटिंगमध्येही आपली ताकद दाखवून दिलीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या  खात्यात १५२५ धावा असून यात दोन शतकांसह १३ अर्धसतकांचा समावेश आहे. रणजी स्पर्धेत तनुष कोटियन हा २९ विकेट्स मिळवण्याशिवाय ५०२ धावा करत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. २६ वर्षीय गोलंदाजाने देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटमध्ये  विशेष छाप सोडत टीम इंडियात एन्ट्री मारणारा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरणजी करंडकबीसीसीआयमुंबई