Akash Deep Travis Head, Aus vs Ind 4th Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT 2024-25) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारताला या दौऱ्यात सर्वाधिक धोका ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रेव्हिस हेडपासून आहे. त्याने आतापर्यंत भारताला डोकेदुखी दिली आहे. त्याच्याबद्दल टीम इंडियाने एक प्लॅन आखला आहे.
हेड विरूद्ध भारताचा प्लॅन
भारतीय संघ मेलबर्न कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. या मालिकेतही पाहुण्यांसाठी 'डोकेदुखी' ठरलेल्या ट्रेव्हिस हेडसाठी टीम इंडिया मेलबर्न कसोटीसाठीही विशेष योजना आखत आहे. सध्याच्या मालिकेत हेडने दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४०९ धावा केल्या आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने २२ डिसेंबरला MCG येथे पत्रकार परिषदेत ट्रेव्हिस हेडबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले.
पत्रकार परिषदेत आकाश दीप म्हणाला, "प्लॅन पूर्ण सांगता येणार नाही नाहीतर तो देखील त्याप्रकारे तयारी करेल.वेगवान गोलंदाज म्हणून आम्ही त्याच प्रकारचे चेंडू टाकू आणि आमच्या गोलंदाजीत शिस्त राखू. आम्ही दोन्ही बाजूंनी गोलंदाजी करू, खेळपट्टी आणि परिस्थिती पाहून त्यानुसार फायनल प्लॅनिंग करू."
पुढे आकाश दीप म्हणाला, "मला वाटतं ट्रेव्हिस हेड विशेषतः शॉर्ट बॉल खेळताना अडचणीत येतो. आम्ही त्याला क्रीजवर स्थिरावू देणार नाही. आम्ही त्याच्या काही विशिष्ट गोष्टींना लक्ष्य करू आणि त्याला चुका करण्यास भाग पाडू, ज्यामुळे आमच्यासाठी विकेटची संधी निर्माण होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी युवा खेळाडूंना खूप पाठिंबा दिला आहे, त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंसोबत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात आलोय असे वाटत नाही. आम्ही सारेच खूपच कंफर्टेबल आहोत.