aus vs ind test series : २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील हे सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील चार सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. भारताच्या आव्हानात्मक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लोकेश राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन हे पारंपरिक शैलीतील फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगून माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याने कसोटी संघात चेतेश्वर पुजाराला स्थान मिळायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.
उथप्पा पुढे म्हणाला, 'आम्हाला बचावात्मक खेळणाऱ्या पारंपरिक फलंदाजाची गरज आहे. राहुल किंवा ईश्वरन ही भूमिका वठवू शकतील. या दोघांशिवाय ही जबाबदारी स्वीकारू शकेल, असा एकही फलंदाज दिसत नाही. प्रत्येक जण सकारात्मक, आक्रमक खेळून वेगवान धावा काढू इच्छितो. त्यात शुभमनचा समावेश आहे. तो वेगवान फटकेबाजीवर भर देतो. मंद खेळ करणे त्याच्या स्वभावात नाही.' 'पुजाराने २०१८-१९ आणि २०२०-२१च्या ऐतिहासिक विजयात मोठा वाटा उचलला होता. यंदा मात्र तो मालिकेचा भाग नाही. मला आताही वाटते की, पुजारा या मालिकेसाठी संघात असायला हवा', असे मत उथप्पाने नोंदविले. यश दयालबाबत उथप्पा म्हणाला, 'त्याच्यात जिद्द आहे. जिद्दीच्या बळावर तो संघाला यश मिळवून देऊ शकतो. दयालला संधी मिळायला हवी.'
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.