Irfan slams Virat Kohli : भारताचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याने विराट कोहलीवर सडकून टीका केलीये. भारतीय क्रिकेटमध्ये "सुपरस्टार कल्चर" नको, असं म्हणत त्याने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर फलंदाजीतील उणीवा भरून काढण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेट का खेळत नाही.? असा प्रश्नही इरफान पठाण याने उपस्थिती केलाय. भारतीय संघानं जवळपास १० वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावली. सिडनी कसोटी सामन्यात ६ विकेट्स राखून विजय नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या संघानं बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळवलेली ५ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकाच पॅटर्नमध्ये आउट होताना दिसला विराट, पठाणनं साधला निशाणा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीचा फ्लॉप शो चर्चेचा विषय राहिला. खराब फॉर्ममुळे सिडनी कसोटी सामन्यातून रोहित शर्मानं स्वत:ला माघार घेतली. दुसरीकडे विराट कोहली मात्र फॉर्म नसताना संघात कायम राहिला. सिडनी कसोटी सामन्यात त्याच्या बॅटिंगमधील चमक काही दिसली नाही. भारतीय संघाने मालिका गमावण्यामागच्या कारणापैकी विराट कोहलीचा खराब फॉर्म हा देखील कारणीभूत आहे. कोहली सातत्याने एकाच पॅटर्नमध्ये बाद होताना दिसून आले. या मुद्यासह इरफान पठाण याने त्याची मागची आकडेवारी काढत कोहलीच्या संघातील स्थानावरच प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.
पठाणनं कठोर शब्दांत व्यक्त केला विराटवरील राग
सिडनीच्या मैदानात झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजांनी दमदार कामगिरीसह टीम इंडियाला पुन्हा सामन्यात आणलं. पण दुसऱ्या डावातही फलंदाजांनी नांगी टाकली. त्यात विराट कोहलीनं पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विकेट फेकली. त्यामुळे इरफान पठाण विराट कोहलीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये त्याने कोहलीवरील राग कठोर शब्दांत व्यक्त केला.
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल पठाण म्हणाला की,
२०२४ मध्ये पहिल्या डावात मॅच सेट करणारी खेळीची गरज असताना कोहलीनं फक्त १५ च्या सरासरीने धावा काढल्या. मागील पाच वर्षांतील आकडेवारी काढली तर त्याच्या (विराट कोहली) सरासरीचा आकडा ३० वरही पोहचत नाही. भारतीय संघाला सिनियर खेळाडूकडून ही अपेक्षा आहे का? मग त्याच्या जागी युवा खेळाडूला नियमित संधी द्या. त्याला तयार व्हायला वेळ मिळेल. त्या खेळाडूनं २५-३० च्या सरासरीनं धावा केल्या तरी हरकत नाही. कारण आपण टीमचा विचार करायला हवा. व्यक्तिगत नाही.
सुपरस्टार संस्कृतीची गरज नाही; विराटला दिला सचिनचा दाखला
भारतीय क्रिकेटला सुपरस्टार संस्कृतीची गरज नाही. आपण टीम संस्कृती जपली पाहिजे. विराट कोहली फ्री असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये कधी खेळला आहे? जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ झाला असेल. निवृत्तीआधी महान सचिन तेंडुलकरही देशांतर्गत क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले.
Web Title: AUS vs IND Irfan Pathan Raised Questions On Virat Kohlis Superstar culture
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.