भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पर्थच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार अशी चर्चा रंगताना दिसते. अद्याप बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही. पण आयसीसीच्या खास पोस्टमुळे पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराह हाच टीम इंडियाचा कॅप्टन असणार याची पुष्टी झाली आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहच्या खांद्यावर कॅप्टन्सीच ओझं
आयसीसीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन बॉर्डर गावसकर ट्रॉफीसंदर्भातील खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स या दोघांशिवाय ट्रॉफीची झलक पाहायला मिळते. ही पोस्ट पर्थ कसोटी सामन्यात बुमराहच भारतीय संघाचा कॅप्टन असणार हे चित्र आता स्पष्ट झालं आहे.
बुमराहनं याआधीही केलं आहे टीम इंडियाचं नेतृत्व
जसप्रीत बुमराह हा काही भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व करताना दिसणार नाही. याआधी त्याने एका कसोटी सामन्यासह २ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले आहे. २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय टी-२० सामन्यात बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले होते.
नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करण्याची उत्तम संधी
पर्थ कसोटी सामना हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहेच. याशिवाय बुमराहसाठी नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून देण्याची ही एक उत्तम संधी आहे. रोहितनंतर कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार कोण? हा प्रश्नही अधून मधून चर्चेत असतो. आगामी कसोटी कॅप्टन्सीच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम करण्याची संधी त्याच्याकडे असेल. सप्टेंबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिके वेळी जसप्रीत बुमराहला उप-कर्णधार पदापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यानंतर शुबमन गिल हा भविष्यातील कॅप्टन्सीची चेहरा असेल, अशा चर्चाही रंगल्या. पण न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराह पुन्हा उप-कॅप्टन झाला. आता तो रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन्सी करताना दिसेल. नेतृत्वाची छाप सोडून भावी कर्णधारांच्या शर्यतीत तो आपली दावेदारी अधिक मजबूत करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.