Rohit Sharma Sachin Tendulkar, Team India unwanted record: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे ३६९ धावांचा पल्ला गाठला. तिसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया २३४ धावांत ऑलाऊट झाली. अखेर ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १५५ धावांत आटोपला. या पराभवासह टीम इंडियाला मोठा धक्का बसला. रोहित शर्माने संघाचे नेतृत्व करताना माजी कर्णधार सचिन तेंडुलकरच्या एका नकोशा विक्रमाशी बरोबरी केली.
रोहितची सचिनच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी
टीम इंडियासाठी २०२४-२५चा हंगाम खूप वाईट गेला. भारतीय संघाने या कसोटी हंगामाची सुरुवात बांगलादेश विरुद्धच्या २ सामन्यांच्या मालिकेने केली. टीम इंडियाने ही मालिका २-० ने जिंकली. पण यानंतर टीम इंडियाचे सारे गणितच बिघडले. न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. तब्बल १२ वर्षानंतर भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली. इथेही भारताने पहिला सामना जिंकला. त्यानंतर पुढील ३ पैकी २ सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. वर्षातील शेवटच्या सामन्यातही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच टीम इंडियाने २०२४च्या कसोटी हंगामात ५ कसोटी सामने गमावले आहेत. यामुळे भारताने एका मोसमात सर्वाधिक कसोटी पराभवाच्या आपल्याच नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. याआधी १९९९च्या मोसमात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५ कसोटी सामने गमावले होते. आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हीच नकोशी कामगिरी केली आहे.
भारताच्या नावावरही नकोसा विक्रम
मेलबर्न कसोटीचा निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागला नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना १८४ धावांनी जिंकला. या मोठ्या विजयासह त्यांनी मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यात टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच संपुष्टात आला. ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटी क्रिकेटमधील तब्बल ४९वी वेळ ठरली.