aus vs ind test series : अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. विराट कोहलीलादेखील साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सहा डावांत विराटने ९३ तर रोहितने अवघ्या ९१ धावा केल्या. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मासह टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. आगामी काळात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत मैदानात असेल. या पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताला कोणत्याही परिस्थितीत चार सामने जिंकावे लागतील. किवींविरुद्धच्या पराभवामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC) अंतिम फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी रोहितसेनेला मोलाचा सल्ला दिला. तसेच मागील पराभव विसरुन नव्या उमेदीने मैदानात उतरा, असे विराट-रोहितला त्यांनी सांगितले. "मागील पंधरा वर्षांत विराट आणि रोहितने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करुन 'सर्वोत्तम' असल्याचे दाखवून दिलेय. त्यामुळे त्यांनी मागील मालिकेतील पराभव विसरुन पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका वगळता टीम इंडियाने नेहमीच चांगला खेळ केला आहे. आगामी मालिकेसाठी त्यांना माझ्या शुभेच्छा... आमच्या संघातील फिरकीपटू, गोलंदाज आणि फलंदाजांचा अभिमान वाटतो. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी त्यांना खूप शुभेच्छा", असे कपिल देव यांनी सांगितले. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.
दरम्यान, अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडने २५ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारताला ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले. घरच्या मैदानावर भारताची इतकी वाईट अवस्था पहिल्यांदाच झाल्याने चाहते संतप्त आहेत. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, एखाद्या कसोटी सामन्यात किंवा मालिकेत झालेली हार पचवणे ही सोपी गोष्ट नाही. आम्हाला उत्तम क्रिकेट खेळणे जमले नाही हे मी मान्य करतो. न्यूझीलंड आमच्याविरुद्ध पूर्ण मालिकेत चांगली खेळली. आम्ही खूप चुका केल्या. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये पहिल्या डावात आम्ही फारशा धावा करू शकलो नाही. या सामन्यात आम्हाला पहिल्या डावात आम्हाला २८ धावांची आघाडी मिळाली होती. आज मिळालेले आव्हान पार होण्यासारखे होते, पण आम्ही सांघिक कामगिरीत कमी पडलो.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.