कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणार हे अगदी स्पष्ट आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा काही सामन्याला मुकणार असल्याचे समोर येत आहे. आधीपासूनच या दौऱ्यावर भारतीय संघ अतिरिक्त सलामीवीरासह संघ बांधणी करेल, अशी चर्चा रंगत होती.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी 'डार्क हॉर्स' ठरु शकतो पृथ्वी शॉ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठीच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यापैकी एकाला संधी मिळेल, अशी चर्चा रंगत आहे. या शर्यतीत पुणेकर ऋतुराज थोडा मागेच पडल्याचे दिसत असताना आता या शर्यतीत मुंबईकर पृथ्वी शॉच्या नावाचा समावेश झाला आहे. भारताचे माजी निवडकर्ता जतिन परांजपे यांनी पृथ्वीच्या नावाचा उल्लेख करून अतिरिक्त सलामीवीराच्या शर्यतीत नवं ट्विस्ट पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी निवडकर्त्यांना पृथ्वी शॉ हा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी 'डार्क हॉर्स' ठरेल, असे वक्तव्य केले आहे. अतिरिक्त सलामीच्या फलंदाजांमध्ये तो प्रमुख दावेदार आहे, असे ते म्हणाले आहेत.
टीम इंडियात कमबॅक करण्यासाठीची 'कसोटी', आधी पृथ्वीला हे करुनं दाखवाव लागेल
पृथ्वी शॉ हा एक आक्रमक फलंदाज आहे. तो धावफलक झटपट पुढे नेण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याची खेळी टॉप ऑर्डरमध्ये एक वेगळा डायनॅमिक सेट करणारी असते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो 'डार्क हॉर्स' ठरु शकतो, असे मत माजी निवडकर्त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी परांजपे यांनी टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडावी लागेल, हे देखील स्पष्ट केले. तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे, यात कोणतीही शंका नाही. पण टीम इंडियात स्थान मिळवण्याची स्पर्धा खूपच कठीण आहे. यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला दमदार कामगिरी करावी लागेल. ते त्यानं करून दाखवलं तरच तो या शर्यतीत टिकेल, असेही ते म्हणाले आहेत. सध्या पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाकडून खेळत आहे.
कसा आहे पृथ्वी शॉचा कसोटीतील शो!
पृथ्वी शॉ गत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा भाग होता. २०२० मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच तो शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. २०१८ मध्ये शतकी खेळीसह अगदी झोकात कसोटी पदार्पण करणाऱ्या पृथ्वीला संघातील स्थान टिकवणं जमलं नाही. खेळीतील सातत्याचा अभाव आणि दुखापत यामुळे तो टीम इंडियातून बाहेर गेला. त्याने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले असून यात ४२.३७ च्या सरासरीने त्याने ३३९ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने १३४ धावांची खेळी केली होती. तो भारताकडून कसोटीत पदार्पणात शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाजही ठरला होता.
Web Title: AUS vs IND Test Series Prithvi Shaw is a dark horse' Ex-India selector's pick him name for Border-Gavaskar Trophy Ruturaj Gaikwad Also In Race
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.