AUS vs IND Travis Head Becomes First Batter To Register King Pair & Century At Same Venue : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानातील ट्रॅविस हेडचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या डोकेदुखीवरील 'पेन किलर' ठरेल, असे वाटत होते. पण ती आस या गड्यानं फोल ठरवली. तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात दाबात बॅटिंग करत ट्रॅविस हेडनं भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. कसोटी कारकिर्दीतील नववे शतक झळकावत तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. याआधी अॅडिलेडच्या मैदानातही त्याने अशीच दमदार कामगिरी केली होती.
ट्रॅविस हेडचा गाबाच्या मैदानातील रेकॉर्ड, तीन वेळा 'गोल्डन डक'चा शिकार
याच वर्षी जानेवारीमध्ये ट्रॅविस हेड वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन गाबाच्या मैदानात सपशेल अपयशी ठरला होता. दोन्ही डावात त्याच्या पदरी भोपला पडला. एवढेच नाही तर पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला होता. पहिल्या डावात त्याला केमार रोच (Kemar Roach) तर दुसऱ्या डावात शमार जोसेफ (Shamar Joseph) नं त्याला आल्या पावली माघारी धाडले होते. एवढेच नाही तर या सामन्याआधी या मैदानात खेळलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावातही त्याच्या पदरी भोपळा आला होता. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याच्यावर गोल्डन डकची वेळ आली होती.
एक विक्रम असाही
जिथं तीन वेळा 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली तिथं शतक साजरे करत एक खास विक्रमही त्याने आपल्या नावे नोंदवला आहे. एकाच वर्षात गाबाच्या मैदानात दोन 'गोल्डन डक' नंतर त्याच्या भात्यातून शतक आल्याचे पाहायला मिळाले. अशी कामगिरी नोंदवणारा क्रिकेट इतिहासातील तो पहिला फलंदाजही ठरलाय. भारतीय संघाविरुद्ध त्याचे हे तिसरे कसोटी शतक आहे. गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याने टीम इंडियाविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. अॅडिलेडच्या मैदानात पिंक बॉलवर झळकावलेल्या शतकानंतर आता ब्रिस्बेनमध्येही त्याची बॅट तळपलीये.