AUS vs IND, Virat Kohli 100th Match Against Australia : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबाच्या क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया मैदानात उतरली अन् या सामन्यासाठी गाबाच्या मैदानात एन्ट्री मारताच विराट कोहलीची नावे खास 'सेंच्युरी'ची नोंद झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा किंग कोहलीचा हा शंभरावा सामना आहे. भात्यातून शतकी खेळीसह तो हा सामना आणखी खास करेल, अशीच चाहत्यांची अपेक्षा असेल.
सचिन पहिला! त्याच्यापाठोपाठ लागतो किंग कोहलीचा नंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध शंभरावा सामना खेळणारा विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज आहे. कांगारुंच्या संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ११० सामने खेळले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात एन्ट्री मारताच विराट कोहली शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये सामील झाला.
तेंडुलकरच्या नावेच आहे एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड
क्रिकेट जगतात कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावेच आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो ११० सामने खेळला आहे. एवढे सामने अन्य कोणताही खेळाडू कोणत्याही एका संघाविरुद्ध खेळलेला नाही. या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धने या दोन दिग्गजांचाही समावेश आहे.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
- ११० - सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- ११० - महेला जयवर्धने विरुद्ध भारत
- १०९ - सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
- १०५ - सनथ जयसूर्या विरुद्ध पाकिस्तान
- १०३ - सनथ जयसूर्या विरुद्ध भारत
- १०३ - महेला जयवर्धने विरुद्ध पाकिस्तान
- १०० - विराट विरुद्ध ऑस्ट्रेलिया*