भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात खेळवण्यात येणार आहे. पर्थच्या मैदानात शतकी खेळी करणारा विराट कोहली या सामन्यात मोठी खेळी करेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा असेल. पण किंग कोहलीचा या मैदानातील रेकॉर्ड काही फारचा चांगला नाही.
ब्रिस्बेनच्या मैदानात किंग कोहली पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत
किंग कोहली ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड, पर्थ, सिडनी मेलबर्न, कॅनबेरा आणि होबार्ट या सर्व मैदानात सेंच्युरी झळकावली आहे. पण आतापर्यंत त्याच्या भात्यातून गाबाच्या मैदानात सेंच्युरी आलेली नाही. तो या मैदानातील शतकी दुष्काळ यावेळी तरी संपवणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं आपण एक नजर टाकुयात ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर कसा आहे विराट कोहलीचा रेकॉर्ड अन् कोणत्या भारतीय खेळाडूनं या मैदानात झळकावलीये सेंच्युरी त्या रेकॉर्ड्सवर
ब्रिस्बेनच्या मैदानात शतकी खेळी करणारे भारतीय
- मुरली विजय
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या मैदानात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी सलामीवीर मुरली विजय याचा समावेश आहे. २०१४ मध्ये या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने २१३ चेंडूत १४४ धावांची खेळी केली होती. पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. कारण टीम इंडियाने हा सामना गमावला होता.
- सौरव गांगुली
भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या मैदानात खेळलेल्या सामन्यापैकी एकमेव सामना अनिर्णित राहिला आहे. २००३ मध्ये सौरव गांगलीनं या मैदानात खेळताना १९६ चेंडूत १४४ धावांची खेळी केली होती.
- सुनील गावकर
लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही ब्रिस्बेनच्या मैदानात शतक झळकावलं आहे. १९७७ मध्ये रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात गावसकरांच्या भात्यातून ११३ धावांची खेळी आली होती. पण या सामन्यातही टीम इंडियाच्या पदरी निराशा आली होती. भारतीय संघाने हा सामना १६ धावांनी गमावला होता.
- जयसिम्हा
ब्रिस्बेन कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकवण्याचा पराक्रम हा मोगनहल्ली जयसिम्हा यांनी करून दाखवला होता. १९६८ मध्ये त्यांनी या मैदानात ३९५ धावांचा पाठलाग करताना १०१ धावांची खेळी केली होती. या सामन्यातही ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली होती.
ब्रिस्बेनच्या मैदानातील विराट कोहलीचा रेकॉर्ड
भारताचा स्टार बॅटर विराट कोहलीनं आतापर्यंत ब्रिस्बेनच्या मैदानात एकमेव कसोटी सामना खेळला आहे. २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो हा सामना खेळला होता. या सामन्यात विराट कोहलीनं पहिल्या डावात १९ धावा तर दुसऱ्या डावात फक्त १ धाव केली होती. पहिल्या डावात जोश हेजलवूड आणि दुसऱ्या डावात मिचेल जॉनसन याने किंग कोहलीची विकेट घेतली होती.