पर्थ कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने फलंदाजीतील आपली ताकदही दाखवून दिलीये. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल यानं यशस्वी जैस्वालच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या डावात ही जोडी चांगलीच जमली. २० वर्षांत जे घडलं नाही ते या दोघांनी पर्थच्या मैदानात करून दाखवलं. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं शतकी भागीदारीचा डाव साधला. २००४ नंतर ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय सलामी जोडीनं केलेली ही पहिली शतकी भागीदारी ठरलीये.
२००४ मध्ये या सलामी जोडीनं केली होती शतकी भागीदारी
लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी तब्बल २० वर्षांचा दुष्काळ संपवत, पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. याआधी २००४ मध्ये विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा जोडीनं सिडनी कसोटी सामन्यात १२३ धावांची भागीदारी केली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियातील मैदानात शतकी भागीदारी करणारी भारतीय संघाची ही तिसरी जोडी आहे. यशस्वी-जैस्वाल यांनी शतकी भागीदारीसह ऑस्ट्रेलियात खास 'चौकार' मारला आहे. अर्थात ऑस्ट्रेलियन मैदानात पहिल्या विकेटसाठी भारताकडून ही सलामी जोडीनं केलेली चौथी शतकी भागीदारी आहे.
ऑस्ट्रेलियात सर्वोच्च भागीदारी करणारी सलामी जोडी कोणती माहितीये?
भारताकडून ऑस्ट्रेलियात शतकी भागीदारी करणाऱ्या सलामी जोडीच्या यादीत सुनील गावसकर आणि के श्रीकांत ही जोडी टॉपला आहे. १९८६ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन जोडीनं सिडनी कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर २००३ मध्ये आकाश चोप्रा आणि सेहवागनं मेलबर्न कसोटी सामन्यात १२४ धावांची भागीदारी केली होती. २०२४ पुन्हा एकदा ही जोडी ऑस्ट्रेलियात हिट ठरली. सिडनी कसोटीत या दोघांनी १२३ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता यशस्वी आणि लोकेश राहुल ही सलामी जोडी ऑस्ट्रेलियात हिट ठरलीये.