नवी दिल्ली : आज विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. खरं तर यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. आजच्या सामन्यातील विजय कांगारूच्या संघाला उपांत्य फेरीकडे नेऊ शकतो. मात्र त्यांच्या या वाटेत इंग्लिश संघाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण अ गटातून न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 168 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानला आता विजयासाठी 169 धावांची गरज आहे.
तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरोन फिंचच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी कांगारूच्या डावाची सुरूवात केली मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी यजमान संघावर सुरूवातीपासून दबाव टाकला. वॉर्नर 25 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मिचेल मार्शने 30 चेंडूत 45 धावांची खेळी करून डाव सावरला. तर ग्लेन मॅक्सवेलने 32 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी करून अफगाणिस्तानसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर फजलहक फारुकीने 2 बळी घेतले. राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
कसे असेल उपांत्य फेरीचे समीकरण
- ऑस्ट्रेलिया 100 धावांनी जिंकल्यास इंग्लंडला 47 धावांनी विजय मिळवावा लागेल.
- ऑस्ट्रेलिया 80 धावांनी जिंकल्यास इंग्लंडला 29 धावांनी विजय मिळवावा लागेल.
- ऑस्ट्रेलिया 50 धावांनी जिंकल्यास इंग्लंडला 1 धावांनी विजय मिळवावा लागेल.
खरं तर अ गटातून न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. यजमान संघाचा नेटरनरेट कमी असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजच्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट करणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेचा सामना उद्या होणार आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला नेटरनरेटच्या बाबतीत मागे टाकायचे असेल तर कांगारूच्या संघाने अफगाणिस्तानला 106 धावांपर्यंत रोखायला हवे. मात्र अफगाणिस्तानने 118 धावा केल्या तर इंग्लंडच्या संघाला त्यांच्या पुढच्या सामन्यात फक्त विजय मिळवावा लागेल. त्यामुळे यजमान संघ अफगाणिस्तानला रोखणार का हे पाहण्याजोगे असेल.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच संघ -
मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरन ग्रीन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडला
न्यूझीलंडने आयर्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. अ गटातून न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस होईल. सध्या या दोन्हीही संघाचे 5-5 गुण असून त्यांचा प्रत्येकी 1-1 सामना राहिला आहे. मात्र इंग्लंडचा नेटरनरेट जास्त असल्यामुळे इंग्लिश संघ उपांत्य फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. तर ब गटातून भारतीय संघ 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र भारत ब गटातून दुसऱ्या स्थानावर राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडविरूद्ध होईल. याशिवाय भारत जर अव्वल स्थानावरच राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो.
2015 पासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा प्रवास
- - 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे उपविजेते.
- - 2016 टी-20 विश्वचषकाचा उपांत्य फेरीपर्यंत पोहचले.
- - 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते.
- - 2021 टी-20 विश्वचषकाचे उपविजेते.
- - 2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र.
Web Title: AUS vs IRE Australia set Afghanistan a target of 169 runs to win, know the semi-final equation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.