ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs NED Hat-trick for Starc - ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या आधी सराव सामने खेळवले जात आहेत. ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसाने रद्द करावा लागला. त्याच वेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातला सामना पावसामुळेच २३-२३ षटकांचा खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने हॅट्ट्रिक घेऊन भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. तिरुअनंतपुरममध्ये येथे सुरू असलेल्या सामन्यात स्टार्कने तीन चेंडूत नेदरलँडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि वर्ल्ड कपपूर्वी हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत १६६ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने सलामीला येताना ४२ चेंडूंत ५५ धावा चोपल्या. अॅलेक्स केरी ( २८), कॅमेरून ग्रीन ( ३४) व मिचेल स्टार्क ( २४*) यांनी योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक टाकणाऱ्या स्टार्कने ५व्या चेंडूवर मॅक्स ओ'डॅडला (०) LBW बाद केले. शेवटच्या चेंडूवर वेस्ली बार्सी ( ०) ला क्लीन बोल्ड केले. यानंतर, जेव्हा त्याने डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विक्रमजीत सिंगला (९ धावा) क्लीन बोल्ड करून हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर नेदरलँड्सची पडझड अशीच सुरू राहिली आणि १४ षटकांत त्यांचे ६ फलंदाज ८३ धावांत तंबूत परतले.
स्टार्कच्या हॅट्ट्रिकमुळे भारतासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. कारण २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला चेन्नईत भारताचा सामना करावा लागणार आहे. ज्यामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क टीम इंडियाच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या फलंदाजांसमोर नव्या चेंडूने धोकादायक ठरू शकतो.