नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून कांगारूच्या संघाने विजयी सलामी दिली होती. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या संघाला अवघ्या 82 धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 बाद 195 एवढी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ 82 धावांवर गारद झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 196 तगडे आव्हान ठेवले होते. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली तर मिचेल स्टार्कने 38 धावांची नाबाद खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज गारद झाले. एकट्या ॲडम झाम्पाने 5 बळी पटकावले तर मिचेल स्टार्क (2) शॉन ॲबॉट (2) आणि मार्कस स्टॉयनिसने 1 बळी घेऊन ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
ॲडम झाम्पाने पटकावले 5 बळी न्यूझीलंडचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे आयसीसी क्रमवारीत देखील संघाची घसरण झाली आहे. इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय क्रमवारीतील पहिले स्थान पटकावले असून किवी संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करत कांगारूची फलंदाजी मोडीत काढली होती. ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 बळी घेतले तर मॅट हेनरी (3), टीम साउदी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1-1 बळी पटकावून ऑस्ट्रेलियाच्या संघाला 195 धावांपर्यंत रोखले होते. मात्र दुसऱ्या डावात एकट्या ॲडम झाम्पाने सर्वाधिक 5 बळी पटकावून न्यूझीलंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. न्यूझीलंडकडून कोणत्याच फलंदाजाला 20 चा आकडा गाठता आला नाही. डावाच्या 33 व्या षटकात किवी संघ सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली.
ICC क्रमवारीत न्यूझीलंडची घसरणआयसीसी एकदिवसीय क्रमवारीत 119 रेटिंगसह इंग्लिश संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर 117 रेटिंगसह न्यूझीलंडच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे 111, 107. 104 आणि 101 रेटिंगसह आहेत. मे 2021 मध्ये न्यूझीलंडच्या संघाने अव्वल स्थान गाठले होते. मात्र आता इंग्लंडने त्यांचे अव्वल स्थान पुन्हा मिळवले असून किवीच्या संघाला धक्का दिला आहे. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये केवळ 2 गुणांचे अंतर आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून हे अंतर कापणे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान असणार आहे.