ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 416 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा पहिला डाव 166 धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 251 धावांची आघाडी घेऊन पुन्हा मैदानावर फलंदाजीस उतरण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्या डावात डेव्हीड वॉर्नरनं एका विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम करणारा तो ऑस्ट्रेलियाचा 12वा फलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जो बर्न्स यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. बर्न्स 9 धावांवर कॉलीन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर वॉर्नर व लॅबुश्चॅग्ने या जोडीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉर्नर 74 चेंडूंत 4 चौकार लगावताना 43 धावांत माघारी परतला. लॅबुश्चॅग्नेनं तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसह शतकी भागीदारी केली. वॅगनरनं ही जोडी फोडली. त्यानं स्मिथला 43 धावांवर माघारी पाठवले.
लॅबुश्चॅग्नेनं 240 चेंडूंत 18 चौकार व 1 षटकार खेचून 143 धावा केल्या. मॅथ्यू वेडला अप्रतीम चेंडूवर टीम साऊदीनं त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडनं ( 56) अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. लॅबुश्चॅग्नेलाही वॅगनरनं बाद केले. त्यानंतर टीम पेन ( 39), मिचेल स्टार्क ( 30) यांनी संयमी खेळ केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 416 धावांत गडगडला. किवींच्या टीम साऊदी ( 4/93) आणि नील वॅगनर ( 4/92) यांनी चार विकेट्स घेतल्या.
किवींच्या जीत रावल आणि टॉम लॅथम यांना अवघ्या एका धावेवर जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांनी माघारी टाकले. त्यानंतर विलियम्सन आणि टेलर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना किवींचा डाव सावरला. पण, त्यांची ही भागीदारी स्टार्कनं संपुष्टात आणली. केन 34 धावांवर असताना स्मिथनं अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवलं. टेलरनं 80 धावांची खेळी करताना किवींचा संघर्ष कायम राखला होता, परंतु स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा संपूर्ण संघ 166 धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 251 धावांची आघाडी घेत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात वॉर्नरनं कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला ओलांडला.
ऑस्ट्रेलियाकडून 7000 कसोटी धावा करणारे फलंदाजरिकी पाँटिंग, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मायकेल क्लार्क, मॅथ्यू हेडन, मार्क वॉ, जस्टीन लँगर, मार्क टेलर, डेव्हीड बून, ग्रेग चॅपेल, स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर