AUS vs Oman Live Match Updates : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देताना ओमानच्या नवख्या संघाने चांगली कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना स्वस्तात बाद करण्यात ओमानला यश आले. पण, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आपल्या संघाला तारले. ५१ चेंडूत ५६ धावा करून वॉर्नरने सावध खेळी केली. तर स्टॉयनिसने स्फोटक खेळी करताना षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६४ धावा करून ओमानला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले. ओमानकडून मेहरान खानने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर बिलाल खान आणि कलीमुल्लाह यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाच्या फलंदाजांना शांत ठेवण्यात ओमानला यश आले होते. १२ षटकांत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ६३ अशी होती. पण, अखेरच्या ८ षटकांत स्टॉयनिस नावाचे वादळ आले अन् कांगारूंना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. शेवटच्या ८ षटकांत ऑस्ट्रेलियाने २ बाद १०१ धावा कुटल्या. स्टॉयनिसने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने मारलेल्या एका षटकाराने मात्र मोठे नुकसान झाले. स्टॉयनिसने मारलेला लांबलचक षटकार कार पार्कमधील सोलर पॅनेलचे नुकसान करून गेला.
ऑस्ट्रेलियाचा संघ -मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
ओमानचा संघ -आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, जीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, शोएब खान, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.