Join us

त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला

पाकिस्तानी संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:50 IST

Open in App

Wasim Akram Comment On Kamran Ghulam : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यातून पाकिस्तानच्या कामरान गुलामने आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले. मात्र, शेजारील देशातील माजी खेळाडू वसीम अक्रमने गुलामची समालोचक करत असताना खिल्ली उडवली. अक्रमने कामरान गुलामच्या कुटुंबाची खिल्ली उडवली. वसीम अक्रम हा ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकल वॉनसोबत समालोचन करत होता. यादरम्यान वसीम अक्रम म्हणाला की, कामरान गुलाम एका मोठ्या कुटुंबातून आला आहे. १२ भावांमध्ये त्याचा अकरावा क्रमांक लागतो. याशिवाय त्याला चार बहिणीही आहेत. एकूणच कामरान गुलामचा परिचय देताना अक्रमने भलताच दाखला दिल्याने याची चर्चा रंगली. 

अक्रमने गुलामचा परिचय देताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने स्मित करत म्हटले की, १६ मुले... वाह! या सर्वांच्या वयामध्ये अंतर किती असेल हे जाणून घेणे खूप मनोरंजक असेल. मायकेल वॉनच्या या विधानाचा दाखला देत ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला की, पाकिस्तान निवड समिती... या तीन माजी क्रिकेटपटूंची अनोखी जुगलबंदी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

दरम्यान, तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना चुरशीचा झाला. मेलबर्न वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४६.४ षटकांत २०३ धावा केल्या. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज तथा कर्णधार मोहम्मद रिझवानने ७१ चेंडूत सर्वाधिक ४४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. नसीम शाहने ३९ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर बाबर आझमने ४४ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर त्यांना करता आले नाही. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने ३३.३ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने सर्वाधिक ४९ धावा केल्या. याशिवाय स्टीव्ह स्मिथने ४४ धावांचे योगदान दिले.

टॅग्स :वसीम अक्रमपाकिस्तानआॅस्ट्रेलिया