ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आजपासून सिडनी येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तानने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे. पाच विकेट टिपणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या सुरेख साथीमुळे पाकिस्तानची अवस्था ९ बाद २२७ अशी झाली होती. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या शेपटाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आपला इंगा दाखवला. आमीर जमाल आणि मीर हामजा यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीमुळे पाकिस्तानने तीनशेपार मजल मारली. पाकिस्तानचा डाव अखेरीस ३१३ धावांवर संपुष्टात आला. तर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६ धावा केल्या आहेत.
पहिले दोन्ही कसोटी सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानवरच उलटवला. अब्दुल्लाह शफिक आणि सैम अय्यूब हे पाकिस्तानी सलामीवीर खातेही न उघडता माघारी फिरले. त्यानंतर बाबर आझम (२६) आणि सौद शकील (५) यांनीही निराशा केल्याने पाकिस्तानची अवस्था ४ बाद ४७ अशी झाली.
या पडझडीनंतर ८८ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या मोहम्मद रिझवानने कर्णधार शान मसूदसह( ३५) पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र मसूदला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मसूद बाझ झाल्यावर रिझवानने आगा समलानसह (५३) ९४ धावांची भागीदारी करत पाकिस्तानला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पुन्हा गडगडला आणि त्यांची अवस्था ९ बाद २२७ अशी झाली.
अशा परिस्थितीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या आमीर जमाल याने आपल्या बॅटचा इंगा दाखवला. त्याने चौफेर फटकेबाजी करत मीर हामजाच्या साथीने पाकिस्तानला तीनशेपार मजल मारून दिली. आक्रमक फलंदाजी करत असलेला जमाल ८२ धावा काढून बाद झाला. मात्र तोपर्यंत जमाल आणि हामजा यांनी शेवटच्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करत पाकिस्तानला ३१३ धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ५ तर मिचेल स्टार्कने २ आणि हेजलवूड, मार्श आणि लायन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.