Australia vs Pakistan 2nd ODI Pakistan Thrash Australia By 9 Wickets : मोहम्मद रिझवानच्या नेृत्वाखालील पाकिस्तानच्या संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यातील विजयासह पाक संघानं ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. घरच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३५ षटकात १६३ धावांत आटोपला होता. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बाबर आझमनं सिक्सर मारत संघाचा विजय पक्का केला. हे लक्ष्य पार करताना पाक संघानं फक्त एक विकेट गमावली.
हॅरिस राउफचा 'पंजा'; शाहिन शाह आफ्रिदीची उत्तम साथ
मॅथ्थू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क या जोडीनं ऑस्ट्रेलियाचा डावाला सुरुवात केली. शाहिन शाह आफ्रिदीनं शॉर्टच्या रुपात सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. संघाच्या धावफलकावर अवघ्या २१ धावा असताना तो १५ चेंडूत १९ धावांची भर घालून माघारी परतला. दुसऱ्या सलामीवीरालाही आफ्रिदीनेच तंबूत धाडले. त्यानंतर हॅरिस राउफचा जलवा पाहायला मिळाला. ठराविक अंतराने विकेट्स घेत त्याने ऑस्ट्रेलियाचा कंबरडे मोडले. स्टीव्ह स्मिथनं ४८ चेंडूत केलेल्या ३५ धावा या ऑस्ट्रेलियन संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. परिणामी ऑस्ट्रेलियाचा डाव ३५ षटकात १६३ धावांत आटोपला. पाककडून हॅरिस राउफनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. ३ विकेट्स घेत शाहिन शाह आफ्रिदीनं त्याला उत्तम साथ दिली. याशिवाय नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
सलामी जोडीचा हिट शो; बाबरचाही दिसला तोरा
अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना सैम आयुब आणि अब्दुल्लाह शफिक जोडीनं धमाकेदार खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११३७ धावांची भागीदारी करत सामना अगदी एकतर्फी केला. आयुबनं ७१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. झम्पानं त्याच्या रुपात एकमेव विकेट घेतली. त्याच्या जागी आलेल्या बाबर आझमनं २० चेंडूत नाबाद १५ धावांची खेळी करताना षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या बाजूला शफिक ६९ चेंडूत ६४ धावांवर नाबाद राहिलाय त्याने आपल्या खेळीत ४ चौकारांसह ३ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.