ऑस्ट्रेलियन संघाच्या ताफ्यात आश्चर्यकारकरित्या नेतृत्व बदल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला दमदार कामगिरी करत असलेल्या जोश इंग्लिस याच्याकडे संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. टीम इंडियामुळे विकेट किपर बॅटरला कॅप्टन्सीची लॉटरी लागलीये. घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
मॅक्सवेल अन् स्टॉयनिसकडे कानाडोळा करत जोशला मिळाली कॅप्टन्सीची संधी
या युवा क्रिकेटनं कार्यवाहू कॅप्टन्सच्या शर्यतीत असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांना मागे टाकत ऑस्ट्रेलियन संघाचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे. जोश इंग्लिस पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यातही संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तो पहिल्यांदाच ही जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
पॅट कमिन्स अन् मार्श यांनी टीम इंडियाविरुद्धच्या कसोटीला दिलंय प्राधान्य
२२ नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श दोघांनी कसोटीला प्राधान्य दिल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या जागी नव्या भिडूवर संघाची मोठी जबाबदारी दिली आहे. जोश इंग्लिस याने गतवर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवली होती. अनुभवी विकेटकिपर मॅथ्यू वेडच्या निवृत्तीनंतर २९ वर्षीय खेळाडू विकेट किपरच्या रुपात ऑस्ट्रेलियन संघाची पहिली पसंती आहे.
याआधी ऑस्ट्रेलिया 'अ' संघाची केली होती कॅप्टन्सी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले आहेत की, "जोश वनडे आणि टी२० संघातील नियमित अन् प्रमुख खेळाडू आहे. त्याने याआधी ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचे नेतृत्व केले आहे. आता तो नवी भूमिकाही उत्तमरित्या बजावेल." ग्लेन मॅक्सवेल, स्टॉयनिससह अन्य वरिष्ठ खेळाडूही त्याला सहकार्य करतील, असा विश्वासही बेली यांनी व्यक्त केलाय.
पाक विरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी या खेळाडूंना केलं रिलीज
इंग्लिसच्या प्रमोशननंतर कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या मंडळींना पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यातून रिलीज करण्यात आले आहे. भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन ताफ्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.