Australia vs Pakistan Womens : क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा खेळाडू ब्लँक झालेले पाहायला मिळाले. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या नाणेफेकीत कर्णधार रोहित शर्मा १३ सेकंदासाठी ब्लँक झालेला सर्वांनी पाहिला. तसाच किस्सा पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यात घडला. पाकिस्तानी खेळाडू स्वतःची फजिती करून घेणे, हे काही नवीन नाही. आज तर पुरुष क्रिकेटपटूंनाही मागे टाकणारी फजिती महिला क्रिकेटपटूकडून घडली.
पाकिस्तानचा महिला संघ वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. शनिवारी उभय संघांमधील तिसरा वनडे सामना झाला. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानची यष्टिरक्षक मुनीबा अली 'ब्रेन फेड' प्रसंगाची शिकार झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटच्या षटकात जेस जोनासेन फातिमा सनाच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी पुढे आली, परंतु चेंडू व बॅट यांच्यात नीट संपर्क झाला नाही. अन् तो यष्टिरक्षक मुनीबाच्या दिशेने गेला.
जोनासनला बाद करण्यासाठी यष्टीरक्षकाकडे बराच वेळ होता, पण तिला तेही जमले नाही. मुनीबाच्या या कृत्याने पाकिस्तानी खेळाडू आश्चर्यचकित झाले, तर जोनासनला हसू नाही आवरले. मुनीबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात बेथ मुनी (१३३) आणि मेग लॅनिंग (७२) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ३३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ ७ बाद २३५ धावाच करू शकला. यजमान संघाने पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा ८ विकेट्स राखून, तर दुसऱ्या सामन्यात १० विकेट्स राखून पराभव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"