कोलकाता : वन डे विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. कोलकातातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा थरार रंगणार आहे. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाचे आगमन झाल्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. कारण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्यास दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत प्रवेश करेल अन् कांगारूंना बाहेरचा रस्ता धरावा लागेल. यजमान भारतीय संघाने न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीचे तिकिट मिळवले आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना खेळवला जाणार आहे.
दरम्यान, पावसामुळे अथवा अन्य कोणत्या कारणामुळे सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत ज्या संघाचे गुण अधिक असतील तो संघ फायनलसाठी पात्र ठरेल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियावर मात करू शकतो. लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाची 'बॅटिंग'ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. खेळपट्टीवर अजूनही कव्हर आहे. मोठा पाऊस पडत नसला तरी हलक्या सरी ऑस्ट्रेलियन चाहत्यांना निराश करत आहेत. अशा परिस्थितीत नाणेफेक वेळेवर होते की नाही हे पाहण्याजोगे असेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या १८ वन डे सामन्यांबद्दल भाष्य करायचे झाले तर, आफ्रिकन संघाचा वरचष्मा राहिला आहे. त्यांनी १५ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, कांगारूंना केवळ ३ सामने जिंकण्यात यश आले.