सिडनी : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्याने शानदार शतक झळकावले. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे 30 वे शतक आहे. हे शतक ठोकताच त्याने माजी खेळाडू दिग्गज डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. खरं तर त्यांनी कसोटीत एकूण 29 शतके झळकावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्मिथचे हे एकूण 42वे शतक आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 41 शतके झळकावली आहेत. स्मिथ 192 चेंडूत 104 धावा करून बाद झाला. त्याच्या या शतकी खेळीत11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. स्मिथशिवाय उस्मान ख्वाजानेही शतक झळकावले. ख्वाजा डावाच्या 120 षटकांपर्यंत 172 धावांवर नाबाद खेळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डाव 2 बाद 147 धावा असताना सुरू झाला. ख्वाजा आणि स्मिथ या दोघांनी तिसऱ्या बळीसाठी 209 धावांची मोठी भागीदारी केली. याआधी स्मिथने दुसऱ्या कसोटीतही 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. यजमान कांगारूच्या संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सक्रिय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावरसध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सक्रिय खेळाडूंबद्दल भाष्य करायचे झाले तर, स्टीव्ह स्मिथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 72 शतकांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 45 शतकांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट 44 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांनी देखील 42-42 शतके झळकावली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"