AUS vs SCO T20 World Cup Live Match Updates In Marathi: ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ३५व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड हे संघ भिडले. दोन संघांसाठी महत्त्वाची लढत असल्याने हा सामना प्रेक्षणीय ठरला. या सामन्यावर इंग्लंडच्या संघाचे भवितव्य अवलंबून होते. पण, बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध कडवी झुंज देऊनही स्कॉटलंडला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कांगारूंनी बाजी मारली आणि इंग्लंडची चांदी झाली. कारण ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे इंग्लिश संघाला सुपर-८ मध्ये प्रवेश मिळाला. तर स्कॉटलंडचे स्वप्न भंगले. पण, स्कॉटलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाला दिलेले आव्हान आणि त्यांची कडवी झुंज पाहण्याजोगी होती.
१८१ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार खेळी केली. त्याने ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६८ धावा कुटल्या. याशिवाय मार्कस स्टॉयनिसने स्फोटक खेळी करताना २९ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकार लगावून ५९ धावा केल्या. पण, हे दोघेही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. शेवटच्या काही षटकांत टीम डेव्हिडने मोर्चा सांभाळला. त्याने १४ चेंडूत नाबाद २८ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह स्कॉटलंड स्पर्धेबाहेर झाला अन् इंग्लंडला सुपर-८ चे तिकीट मिळाले.
दरम्यान, ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी सुपर-८ चे तिकीट मिळवले. खरे तर इंग्लंड आणि स्कॉटलंड दोघांचेही प्रत्येकी ५-५ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंड (+३.६११) पुढे असल्याने त्यांना फायदा झाला. स्कॉटलंड पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. एकूणच ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा चौकार अन् स्कॉटलंडचा पराभव... यामुळे इंग्लिश संघाला सुपर-८ मध्ये खेळण्याची आयती संधी मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा संघ - मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, एश्टन एगर.
स्कॉटलंडचा संघ -रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मिचेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस, मिचेल लीस्क, ख्रिस ग्रीव्स, मार्क वाट, क्रिस्टोफर सोल, ब्राड व्हील, साफयान शरीफ.