पर्थ : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. सध्या या स्पर्धेत श्रीलंका आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जात आहे. यजमान संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला आहे, तर श्रीलंकेच्या संघाने विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यजमान संघासमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेच्या डावात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने दोनदा श्रीलंकेचा फलंदाज धनंजय डी सिल्वाला मंकडिंग करून बाद करण्याचा इशारा दिला.
मंकडिंग करण्याचा दिला इशारा
श्रीलंकेच्या डावाच्या पाचव्या षटकाच्या शेवटी ही घटना घडली. स्टार्कने सिल्वाला जागेवरून बाहेर न निघण्याचा सल्ला दिला. मिचेल स्टार्कने धनंजय डी सिल्वाला लवकर क्रिझ सोडल्याबद्दल फटकारले मात्र षटक संपताच दोघांनी चर्चाही केली.
खरं तर रनआउट करण्याची मंकडिंगची पद्धत सध्या खूप चर्चेत आहे. या मुद्द्यावरून क्रिकेट वर्तुळात वाद देखील रंगला होता. भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने लॉर्ड्सवरील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात मंकडिंग करून इंग्लंडच्य चार्ली डिनला बाद केले होते. तेव्हापासून हा मुद्दा अधिक चर्चेत आला. यावर अनेक दिग्गजांनी आपापली मतं मांडली आहेत.
ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे आव्हान
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत देखील स्टार्कने असा इशारा दिला होता. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला कॅनबेरा येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात स्टार्कने मंकडिंग करून बाद करण्याचा इशारा दिला होता. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान संघाला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. किवीच्या संघाने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला. सध्या सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १५७ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: AUS vs SL Australia's Mitchell Starc warns Dhananjay de Silva twice to be dismissed BY mankading
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.