श्रीलंकेला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही दारूण पराभव पत्करावा लागला. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातील शतकवीर डेव्हिड वॉर्नरने आजही लंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याला स्टीव्ह स्मिथची तोलामोलाची साथ मिळाल्यानं ऑस्ट्रेलियानं या सामना 9 विकेट्सनं जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लंकेला 9 बाद 99 धावा करता आल्या. दुसऱ्या सामन्यात लंकेनं शतकी वेस ओलांडली, परंतु विजयासाठी ती पुरेशी ठरली नाही. दनुष्का गुणथिलका ( 21) आणि कुसल परेरा (27) हे वगळता लंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाच्या बिली स्टॅनलेक, पॅट कमिन्स, अॅश्टन अॅगर आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लंकेचा संपूर्ण संघ 19 षटकांत 117 धावांत माघारी परतला.
श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते, ते वॉर्नर आणि स्मिथ यांच्याकडे. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर हे दोघे प्रथमच ऑसींच्या मर्यादित षटकांच्या संघात कमबॅक करणार होते. वॉर्नरला अॅशेस मालिकेत अपयश आले असले तरी त्यानं ट्वेंटी-20त दमदार कमबॅक केला. त्यानं 56 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. मॅक्सवेलनं 28 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीनं 221.42च्या स्ट्राईक रेटनं 62 धावा कुटल्या. तत्पूर्वी, फिंचने 36 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 64 धावा चोपल्या.