AUS vs WI, 1st Test : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मार्नस लाबुशेन याने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ४९८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १९२ धावा केल्या आहेत आणि त्यांना शेवटच्या दिवशी ३०९ धावा करायच्या आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( Kraigg Braithwaite ) याने चौथ्या डावात असा विक्रम केला की ज्यासाठी विंडीजला ५३ वर्ष वाट पाहावी लागली.
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनचा पराक्रम! सुनील गावस्करांच्या १९७१ सालच्या विक्रमाशी बरोबरी
ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ५९८ धावांवर घोषित केला आणि प्रत्युत्तरात विंडीजचा संघ २८३ धावांवर गडगडला. फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १८२ धावांवर घोषित करून विंडीजसमोर ४९८ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशेन ( २०४) आणि स्टीव्ह स्मिथ ( २००*) यांनी द्विशतक झळकावले. मार्नसन लाबुशेन याने दुसऱ्या डावातही ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी केली. एकाच कसोटीत द्विशतक व शतक झळकावणारा मार्नस लाबुशेन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा अन् जगातील ८वा फलंदाज ठरला.
यापूर्वी डॉज वॉल्टर्स ( वि. वेस्ट इंडिज, १९६९), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९७१), लॉरेन्स रोव ( वि. न्यूझीलंड, १९७२), ग्रेग चॅपल ( वि. न्यूझीलंड, १९७४), ग्रॅहम गूच ( वि. भारत, १९९०), ब्रायन लारा ( वि. श्रीलंका, २००१), कुमार संगकारा ( वि. बांगलादेश, २०१४) यांनी हा पराक्रम केला आहे. प्रत्युत्तरात, क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी आश्वासक सुरुवात करताना ११६ धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कने विंडीजला पहिला धक्का देताना चंद्रपॉलला ४५ धावांवर बाद केले. २०१२मध्ये स्टार्कनेच तेजनारायण याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल याला बाद केले होते. शामराह ब्रुक्स ( ११) व जेर्मिन ब्लॅकवूड ( २४) यांना नॅथन लियॉनने माघारी पाठवले.
ब्रेथवेटने चौथ्या दिवसअखेरपर्यंत खिंड लढवताना १६६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर चौथ्या डावांत शतक झळकावणारा तो विंडीजचा तिसरा कर्णधार ठरला. याधी १९५२ मध्ये जेफ्री स्टोलमेयर यांनी १०४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १९६९मध्ये गॅरी सोबर्स यांनी सिडनी कसोटीत ११३ धावा केल्या आणि आज तब्बल ५३ वर्षांनी ब्रेथवेटच्या रुपाने ऑस्ट्रेलियात कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा तिसरा कर्णधार विंडीजला मिळाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"