AUS vs WI 2nd ODI । सिडनी: वन डे मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला सामन्यासह मालिका गमवावी लागली. विडिंजचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकून यजमान कांगारूंनी विजयी सलामी दिली होती. आज दुसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. दुसरा सामना ८३ धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी निर्धारित ५० षटकांत ९ बाद २५८ धावा केल्या.
२५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजला घाम फुटला. किसी कार्टी (४०) वगळता एकाही कॅरेबियन खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अखेर पाहुणा संघ ४३.३ षटकांत अवघ्या १७५ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने ८३ धावांनी विजय मिळवत सामन्यासह मालिका खिशात घातली. २५८ धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कमाल केली. जोश हेझलवुड आणि सीन अबॉट यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेऊन पाहुण्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली. याशिवाय विल सदरलँड (२) तर आरोन हार्डी आणि ॲडम झाम्पा यांना १-१ बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने एक अप्रतिम झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सीन अबॉटच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोस्टन चेसने ग्रीन जिथे क्षेत्ररक्षणाला होता त्या दिशेला चेंडू पाठवला. पण, ग्रीनपासून चेंडू दूर असताना देखील त्याने एका दिशेला डाईव्ह मारून एका हातात अप्रतिम झेल टिपला. ग्रीनच्या या झेलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील दुसराही सामना जिंकून २-० ने मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना पाहुण्या संघासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.