ॲडलेड : ॲडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाचा ४१९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. चौथ्या डावात ४९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॅरेबियन संघ अवघ्या ७७ धावांत गारद झाला. लक्षणीय बाब म्हणजे धावांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी ५३ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने सिडनीच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाचा ३८२ धावांच्या फरकाने पराभव केला होता. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी तीन तर नॅथन लायनने एक बळी पटकावला.
कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १२ वेळा घडले असे१३५ वर्षांच्या कसोटी इतिहासात असे केवळ १२ वेळा घडले आहे, जेव्हा एखादा संघ ४०० किंवा त्याहून अधिक फरकाने सामना हरला आहे. सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा ६७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने एका संघाचा सहा वेळा ४०० धावांच्या फरकाने पराभव केला. वेस्ट इंडिज संघाने हा लाजिरवाणा पराक्रम दोनदा केला आहे. त्याचबरोबर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये नॅथल लायनचे ४५० बळीखरं तर हा सामना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनसाठी अविस्मरणीय ठरला आहे. त्याने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात एक बळी घेतला. यासह त्याने ११२ कसोटी सामन्यांमध्ये ४५० बळींचा आकडा पूर्ण केला. कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेणारा लायन हा ८वा गोलंदाज ठरला आहे. शेन वॉर्न (७०८) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) यांनी ऑस्ट्रेलियाकडून लायनपेक्षा अधिक बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा ४१९ धावांनी विजय ऑस्ट्रेलियाने पहिला डाव सात गडी बाद ५११ धावांवर घोषित केला होता. ट्रॅव्हिस हेड (१७५) आणि मार्नस लाबुशेन (१६३) यांच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात पकड बनवली. लाबुशेनने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले आणि त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २१४ धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"