AUS vs WI 2nd Test : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गॅबा कसोटीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरून ग्रीनला ( Cameron Green ) संधी दिली खरी, परंतु राष्ट्रीय गीत सुरू असताना तो इतर १० खेळाडूंपासून दूर उभा असलेला दिसला. सोशल मीडियावर कॅमेरून ग्रीनचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. ग्रीनसोबत ऑसी संघ असं का वागला, याचे उत्तर सारे शोधू लागले आहेत...
ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हा संघ मागच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकला आहे. WTC या पर्वात ते गुणतालिकेत सध्या अव्वल स्थानावर आहेत. विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचा त्यांचा निर्धार असेल. पण, गॅबा कसोटीपूर्वी ऑसींना धक्का बसला होता. कॅमेरून ग्रीन याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तो या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत शंका होती, परंतु त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अन्य खेळाडूंपासून दूरच राहावे लागणार आहे.
किडनीच्या आजाराने त्रस्त आहे ग्रीनकॅमेरून ग्रीन काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. कॅमेरुन ग्रीनने खुलासा केला आहे की त्याला क्रोनीक किडनी आजार (Chronic Kidney Disease) आहे. जन्मजात त्याला मूत्रपिंडाचा आजार आहे. सुरूवातीला तो केवळ १२ वर्षे जगू शकेल असे सांगितले जात होते, पण त्याने काही अंशी यावर मात केली. '7 क्रिकेट'ला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरूनने सांगितले की, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच मला किडनीचा गंभीर आजार आहे असे सांगितले होते. पण मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. पण नुकत्याच झालेल्या अल्ट्रासाऊंड तपासणीत मला याची लक्षणे जाणवली आणि ही माहिती मिळाली.