AUS vs WI 2nd Test : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत चुरशीचा झाला. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलिया सहज करेल असे वाटत होते. पण, शामर जोसेफ ( Shamar Joseph) याने ऑस्ट्रेलियाला रडवले. काल पायाच्या बोटातून रक्त वाहल्यामुळे रिटायर हर्ट झालेल्या जोसेफने ७ विकेट्स घेतल्या. स्टीव्ह स्मिथ ९१ धावांसह एकटा खिंड लढवत होता, परंतु जोसेफने जोश हेझलवूडचा त्रिफळा उडवून विंडीजला २७ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवून दिला. या विजयाने मालिका १-१ अशी बरोबरीत आली.
२ मुलांचा बाप, बॉडिगार्डची नोकरी सोडून क्रिकेटपटू झाला; शामर जोसेफचा संघर्षमयी प्रवास
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३११ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ९ बाद २८९ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात १९३ धावाच करता आल्या. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्टेलियाला खास सुरुवात करता आली नाही. उस्मान ख्वाजा ( १०), कॅमेरून ग्रीन ( ४२), ट्रॅव्हिस हेड ( ०), मिचेल मार्श ( १०) व अॅलेक्स केरी ( २) यांना माघारी पाठवून ऑसींची अवस्था ६ बाद १३६ अशी केली. स्टीव्ह स्मिथ अर्धशतकासह एकटा खिंड लढवताना दिसला. त्याला मिचेल स्टार्कची साथ मिळाली. पण, अल्झारी जोसेफने ही जोडी तोडली आणि त्यानंतर शामरने आठवा फलंदाज माघारी पाठवला. जोसेफने १० षटकांत ६० धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. लंच ब्रेकनंतर नॅथन लियॉनने चौकाराने सुरुवात केली, परंतु अल्झारी जोसेफने अप्रतिम बाऊन्सर टाकून लियॉनची ( ९) विकेट घेतली. आता वेस्ट इंडिज ऐतिहासिक विजयापासून १ विकेट दूर होते आणि ऑसींना अजूनही २५ धावा करायच्या होत्या. स्टीव्ह स्मिथ ७६ धावांवर खेळत होता आणि त्याने आक्रमक फटका मारून चौकार खेचला. शामरच्या बाऊन्सवर स्मिथ चकीत झालेला आणि त्याचा झेल उडाला होता, पण स्लीपचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. स्मिथने स्कूप खेचून षटकार मिळवून धावांचे अंतर कमी केले. स्मिथला शतकासाठी आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. शामरने जोश हेझलवूडचा त्रिफळा उडवून वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २०७ धावांवर तंबूत परतला आणि ८ धावांनी वेस्ट इंडिज जिंकले. जोसेफने ११.५ षटकांत ६८ धावांत ७ विकेट्स घेतल्या. स्मिथ ९१ धावांवर नाबाद राहिला.