ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी मायदेशात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पर्थ येथे खेळवण्यात आलेला तिसरा ट्वेंटी-२० सामना पाहुण्या संघाने जिंकला. विंडीजने ऑस्ट्रेलियाचा ३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २२० धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १८३ धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र, ही मालिका जिंकण्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाला यश आले.
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला. त्याने ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २ अर्धशतकांच्या मदतीने १७३ धावा केल्या. अप्रतिम खेळीच्या जोरावर त्याने 'मालिकावीर'चा पुरस्कार जिंकला. खरं तर हा पुरस्कार त्याने एका चाहत्याला भेट देऊन सर्वांचीच मने जिंकली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकली. पर्थमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला पण अखेरीस ती मालिका २-१ अशी संपली.
'मालिकावीर' पुरस्कार चिमुकल्याला 'भेट'मालिकावीर हा पुरस्कार मिळाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने तो प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चाहत्याला दिला. वॉर्नरकडून ट्रॉफी मिळाल्याने मुलाला खूप आनंद झाला. डेव्हिड वॉर्नर अनेकदा सामन्यादरम्यान चाहत्यांना भेटवस्तू देत असतो. तो अनेकदा आपले ग्लोव्ह्ज प्रेक्षक गॅलरीत चाहत्यांच्या दिशेने फेकताना दिसला आहे. मंगळवारी पर्थच्या मैदानावर त्याने ट्रॉफीही चाहत्याला भेट दिली. वॉर्नरने गेल्या महिन्यातच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वॉर्नरने वन डे आणि कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटला देखील रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर वॉर्नर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट खेळणार नाही. पर्थमध्ये खेळलेला हा सामना वॉर्नरसाठी घरच्या मैदानावरील शेवटचा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता.
वॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.