सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. आज मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावात एक नाट्यमय तितकीच भयंकर घडामोड घडली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २५८ धावा केल्या.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू सीन ॲबॉटने गगनचुंबी षटकार मारला. प्रेक्षक गॅलरीत आलेला चेंडू टिपण्यासाठी चाहत्यांमध्ये झुंबड उडाली. अशातच सिडनी येथील एका चाहत्याला दुर्दैवाने गंभीर दुखापत झाली. प्रेक्षकांच्या गर्दीत एक चाहता झेल घेण्यासाठी धडपडत असताना चेंडू थेट त्याच्या तोंडावर येऊन पडला. मग रक्तबंबाळ अवस्थेत चाहत्यांला रूग्णालयात न्यावे लागले.
चाहता बनला क्षेत्ररक्षक अन् आलं अंगलट
झेल घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्याच्या हातून चेंडू निसटला अन् तोंडावर आपटला. चेंडूमुळे त्याच्या चष्मा फुटला आणि त्याच्या डोळ्याखालील भागाला दुखापत झाली. हा थरार पाहताच संबंधित चाहत्याच्या आजूबाजूचे प्रेक्षक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत स्तब्ध झाले. इतक्यात त्याच्या बाजूला असलेल्या महिलेने लगेच मदत केली.
यावर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला की, मला वाटते की कोणीतरी एकाने झेल घ्यायला हवा होता. त्याने झेल घेण्यासाठी चांगली तयारी केली होती पण अखेरीस तो चुकला. आशा आहे की तो ठीक असेल, कारण त्याला थोड्या उपचांराची गरज आहे. सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या माजी खेळाडूंनी चाहत्याची फिरकी घेतली. "मला वाटत नाही की तो आज रात्री पबमध्ये जाईल", असे मार्क वॉने म्हटले. मग क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली की दुखापत झालेला चाहता ठीक असून तो पुन्हा एकदा सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी सज्ज आहे. नंतर डोक्यावर पट्टी बांधून हसत असलेला चाहता सर्वांसमोर आला.
Web Title: aus vs wi Australia's Sean Abbott hits a six at the Sydney Cricket Ground during the second ODI, which injures a fan while taking the catch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.