Australia vs West Indies T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला सूर गवसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात आज वॉर्नरने स्फोटक खेळी केली, परंतु त्याची ही खेळी टीम डेव्हिडच्या ( Tim David) फटकेबाजीसमोर झाकोळली गेली. आयपीएलमध्ये Mumbai Indians ने दिलेल्या संधीचं सोनं करणाऱ्या टीम डेव्हिडला ऑसींकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने तेथेही मौके पे चौका मारलाच.. आज विंडीजच्या गोलंदाजांची त्याने चांगलीच धुलाई केली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२०त कॅमेरून ग्रीन व वॉर्नर ही जोडी सलामीला उतरवली. पण, ग्रीन १ धावा करून माघारी परतला. अॅरोन फिंच ( १५), स्टीव्ह स्मिथ ( १७), ग्लेन मॅक्सवेल ( १) हे अपयशी ठरले. वॉर्नर एका बाजूने दमदार खेळ करताना दिसला. त्याने ४१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावा चोपल्या. त्यानंतर टीम डेव्हिडची बॅट तळपली. त्याने २० चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. यापैकी ३४ धावा या त्याने ४ चौकार व ३ षटकार अशा ७ चेंडूंत चोपल्या. मॅथ्यू वेडने १६ धावांचे योगदान देताना ऑस्ट्रेलियाला ७ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचवले.