मेलबर्न - झिम्बाब्बे आज झालेल्या एका अत्यंत रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने सुरुवातील ऑस्ट्रेलियाला १४१ धावांत गुंडाळले. त्यानंतर या आव्हानाचा तीन विकेट्स आणि ६६ चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला. लेग स्पिनर रायन बर्ल झिम्बाब्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने तीन षटकांमध्ये अवघ्या १० धावा देत ५ बळी टिपले. ऑस्ट्रेलियाच्या ९ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नरने ९४ धावा फटकावल्या. मात्र आरोन फिंच ५, स्टिव्हन स्मिथ १, अॅलेक्स करी ४, मार्क स्टोइनिस ३, कॅमरून ग्रीन ३ हे झटपट बाद झाले. एक बाजू लावून धरणारा डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी काही काळ ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पण रायन बर्लने भेदक मारा करत अवघ्या १८ चेंडूच वॉर्नर आणि मॅक्सवेलसह कांगारूंचे शेपूट कापून काढले आणि ऑस्ट्रेलियाला १४१ धावांवर गुंडाळले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला कैटानो (१९) आणि मरुमानी यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र काही फलंदाज झटपट बाद झाल्याने झिम्बाब्वेची अवस्था ५ बाद ७७ अशी झाली आणि सामना रंगतदार स्थितीत पोहोचला. मात्र कर्णधार रेगिस चकाब्वा याने ३७ धावांची संयमी खेळी करताना तळाच्या फलंदाजांच्या मदतीने झिम्बाब्वेला विजयापर्यंत पोहोचवले.