IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेटचा संघा वनडे मालिकेत २-१ अशा फरकानं पराभव झालेला असला तरी वनडे मालिकेचा शेवट गोड झाला आहे. भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा वनडे सामना २ विकेट्सनं जिंकला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत भारतानं ३ चेंडू राखून विजय साजरा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संगानं ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा गेल्या २६ वनडे सामन्यांपासूनचा विजयी रथ अखेर रोखला आहे.
ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली असली तरी आजच्या विजयानं भारतीय महिला संघाच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा कारनामा भारतीय महिला संघानं केला आहे. शेफाली, झूलन गोस्वामी आणि स्नेह राणा या भारतीय संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला आहेत.
भारतीय संघानं आजच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघानं भारताविरुद्ध ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६४ धावा केल्या होत्या. भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली होती. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीनं कांगारुंना सुरुवातीला धक्के दिले. रॅसेल आणि लेनिंग या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना गोस्वामीनं तंबूत धाडलं. १०० धावांच्या आतच ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स पडल्या होत्या. त्यानतर मुने आणि गार्डनर यांनी कांगारुंचा डाव सावरला. दोघांची भागीदारी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत असतानाच भारताचत्या स्नेह राणा हिन ही जोडी फोडली. ऑस्ट्रेलियाच्या मुने हिला ५२ धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर गार्डनर देखील पूजाची शिकार बनली. गार्डनर ६७ धावांवर बाद झाली. तळात मॅग्रान हिनं चांगली फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला २६४ धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. भारताकडून झुलन गोस्वामी हिनं १० षटकांमध्ये ३७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
भारतानं २ विकेट्नं जिंकला सामनाऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीजोडीनं अर्धशतकी भागीदारी रचली खरी पण स्मृती मंधाना मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरली. स्मृती मंधाना स्वस्तात बाद झाली. त्यानंर यास्तिका भाटिया हिनं भारताच्या डावाची कमान सांभाळली. मैदानात जम बसवत यास्तिकानं धावसंख्येला आकार दिला. तिनं ६९ चेंडूत ६४ धावांची मोलाची कामगिरी पार पाडली. तर शेफाली वर्मा हिनं संथ सुरुवात करत भाटियाला चांगली साथ दिली. शेफालीनं ९१ चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. अखेरीस दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी अखेरीस दमदार फलंदाजी करत भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं. दिप्ती शर्मानं ३० चेंडूत ३१ धावा केल्या. तर स्नेह राणानं २७ चेंडूत ३० धावा केल्या. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ४ चेंडूत ३ धावांची गरज होती. झुलन गोस्वामीनं खणखणीत चौकार खेचत सामना २ विकेट्सनं जिंकला. झुलन गोस्वामीला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं.