कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली. अजिंक्य रहाणेचे ( ११७*) शतक , चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहा यांचे अर्धशतक, उमेश यादवची गोलंदाजी ही टीम इंडियासाठी सकारात्मक बाब ठरली. सलामीवीर पृथ्वी शॉ व शुबमन गिल यांना आपली छाप पाडता आली नाही. भारतानं पहिला सराव सामना अनिर्णीत राखला. टीम इंडियाला ९ बाद १८९ धावा करताना ऑस्ट्रेलिया अ संघाला १५ षटकांत १३१ धावा करायच्या होत्या. पण, त्यांना १ बाद ५२ धावाच करता आल्या. पण, या सामन्यात ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवणारी घटना घडली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. वन डे मालिकेत दुखापतग्रस्त झालेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात शिखर धवननं मारलेला चेंडू अडवताना वॉर्नरच्या मांडिचे स्नायू ताणले गेले होते आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यासाठी दाखल केले गेले. त्यानंतर त्यानं उर्वरित वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली. पहिल्या कसोटीपर्यंत तो तंदुरुस्त होईल, याची शक्यताही फार कमीच आहे.
वॉर्नरच्या जागी पहिल्या कसोटीसाठी सलामीवीर म्हणून चर्चेत असलेल्या विल पुकोवस्की ( Will Pucovski) याला भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली. विक्टोरीया क्लबचे प्रतिनिधिव्त करणाऱ्या पुकोवस्की सलग दोन प्रथम श्रेणी सामन्यांत द्विशतक झळकावून चर्चेत आला होता. त्याच्या याच कामगिरीची दखल क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घेतली आणि कसोटी संघात त्याला स्थान दिले. पण, ऑस्ट्रेलिया अ संघाच्या दुसऱ्या डावात त्याच्या हेल्मेटवर जोरदार चेंडू आदळला आणि त्यानं मैदान सोडलं. त्याची ही दुखापत गंभीर असल्यास ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत त्याच्याशिवाय खेळावे लागेल आणि ही त्यांच्यासाठी खरी डोकेदुखी ठरेल.
पाहा व्हिडीओ..
सराव सामने ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून
कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.