कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली. अजिंक्य रहाणेचे शतक, चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहा यांचे अर्धशतक, उमेश यादवची गोलंदाजी ही टीम इंडियासाठी सकारात्मक बाब ठरली. सलामीवीर पृथ्वी शॉ व शुबमन गिल यांना आपली छाप पाडता आली नाही. भारतानं पहिला सराव सामना अनिर्णीत राखला.
अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. रहाणेच्या नाबाद ११७ धावांच्या जोरावर भारत अ संघानं ९ बाद २४७ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचा निम्मा संघ ९८ धावांवर परतला होता, परंतु कॅमेरून ग्रीन आणि टीम पेन यांनी दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिले. पेननं ४४ धावा केल्या. ग्रीन २०२ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२५ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलिया अ संघानं ९ बाद ३०६ धावांवर डाव घोषित केल्या.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पृथ्वी शॉ ( १९), शुबमन गिल ( २९), चेतेश्वर पुजारा ( ०) माघारी परतल्यानंतर हनुमा विहारी ( २८) आणि अजिंक्य रहाणे ( २८) यांनी संघर्ष केला. भारताचे पाच फलंदाज ११९ धावांवर माघारी परतले होते. सराव सामन्यात भारताची हार निश्चित वाटत होती, परंतु पहिल्या डावात अपयशी ठरलेला वृद्घीमान सहा मजबूत भींतीप्रमाणे उभा राहिला. त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही, परंतु सहानं १०० चेंडूंत ७ चौकार लगावून नाबाद ५४ धावा करताना टीम इंडियाला ९ बाद १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.