अॅशेस मालिकेनंतर ( Ashes series) ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या काही खेळाडूंनी मिळून पार्टी करताना हंगामा केला आणि त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, परंतु पार्टी सोडून झोपायला जाण्यास सांगितले. या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन, ट्रॅव्हीस हेड, अॅलेक्स केरी, इंग्लंडचा कर्णधार जो रुट व जेम्स अँडरसन यांचा समावेश होता. होबार्ट येथील हॉटेलच्या टेरेसवर हे सर्व खेळाडू पार्टी करत होते आणि पोलिसांनी त्यांना रूममध्ये जाऊन झोपण्यास सांगितले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डेली टेलीग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी पोलिसांनी या खेळाडूंना रोखले, कारण त्यांच्याकडे गोंधळ, आवाज होत असल्याची तक्रार आली होती. चार पोलीस अधिकाऱ्यांनी या खेळाडूंशी चर्चा केली. हे खेळाडू हॉटेलच्या टेरेसवर पार्टी करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यात महिला अधिकारी बोलतेय की, खूप आवाज होतोय. तुम्हाला इथून जावं लागले. यानंतर हे खेळाडू तेथून निघून गेले.
ऑस्ट्रेलियानं जिंकली मालिका
ऑस्ट्रेलियानं पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून 'अॅशेस' मालिकेवर ४-० असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियानं पाचव्या कसोटीत विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु इंग्लंडचा संघ १२४ धावांवर गडगडला. बिनबाद ६८ अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडनं पुढील २२ षटकांत ५६ धावांत १० फलंदाज गमावले. त्यामुळे इंग्लंडवर पराभवाचा नामुष्की ओढावली. पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मॅन ऑफ दी मॅच आणि मालिकेत सर्वाधिक ३५७ धावा केल्या म्हणून मॅन ऑफ दी सीरिज या पुरस्कारानं गौरविण्यात आले.