Join us  

डे-नाईटमध्ये ऑसीचेच वर्चस्व, टीम इंडियाचा धावसंख्येचा नीचांक

India vs Australia : भारताचा डाव ३६ धावांत आटोपल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करीत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 4:35 AM

Open in App

ॲडिलेड : पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाची फलंदाजी दुसऱ्या डावात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पहिल्या कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशी ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा डाव ३६ धावांत आटोपल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करीत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटी वर्चस्व कायम राखले.खेळपट्टी खराब नव्हती, पण जोश हेजलवूड (५ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी) आणि पॅट कमिन्स (१०.२ षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी) यांनी अचूक मारा करीत भारताचा दुसरा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.भारताने दुसऱ्या डावात ९ बाद ३६ धावा केल्या होत्या त्यावेळी मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले आणि भारताचा डाव संपुष्टात आला. भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी इतिहासात ही नीचांकी धावसंख्या ठरली. भारताची यापूर्वीची नीचांकी धावसंख्या ४२ होती. १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर भारताचा डाव ४२ धावांत संपुष्टात आला होता. कसोटी क्रिकेटमध्ये नीचांकी धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंड संघ १९५५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ऑकलंडमध्ये २६ धावांत गारद झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाची कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्त पाचवी नीचांकी धावसंख्या आहे.भारताला पहिल्या डावात ५५ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचे लक्ष्य मिळाले. शमी दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत ९३ धावा करीत दिवस-रात्र कसोटीतील आपली शानदार कामगिरी कायम राखली. ऑस्ट्रेलियाला या विजयाने विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ३० गुण मिळाले. त्यांचा कर्णधार टीम पेन नाबाद ७३ धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताने सलग तिसरा सामना तीन दिवसांमध्ये गमावला. त्याआधी, यंदा सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने तीन दिवसांत गमावले होते.भारताच्या अडचणीमध्ये आणखी भर पडली आहे. वेगवान गोलंदाज शमीच्या मनगटाला दुखापत झाली असून तो मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्सचा उसळलेला चेंडू त्याच्या मनगटावर आदळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. भारताचा डाव २१.२ षटकांत संपुष्टात आला. गोलंदाजीमध्ये भारताला शमीची उणीव भासली. 

- ऑस्ट्रेलियन वंगवान गोलंदाजांच्या अतिरिक्त उसळी मिळालेल्या चेंडूंपुढे भारतीय फलंदाजांच्या उणिवा स्पष्ट झाल्या. गोलंदाजांनी चेंडूच्या सिमचा चांगला वापर केला.- वेग व उसळी असलेल्या चेंडूंपुढे भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही.- नाईटवॉचमन जसप्रीत बुमराह (२) पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर हेजलवूड व कमिन्सने भारताच्या मजबूत मानल्या जाणाऱ्या फलंदाजीच्या बाजूची पिसे काढली.- मयांक अग्रवाल (९), चेतेश्वर पुजारा (०) आणि अजिंक्य रहाणे (०) हे तिन्ही फलंदाज सारख्याच पद्धतीने बाद झाले. हे तिन्ही फलंदाज यष्टिरक्षक पेनकडे झेल देत माघारी परतले.

धा व फ ल क

भारत पहिला डाव २४४ऑस्ट्रेलिया पहिला डाव १९१भारत दुसरा डाव पृथ्वी शॉ त्रि. गो. कमिन्स ०४, मयांक अग्रवाल झे. पेन गो. हेजलवूड ०९, जसप्रीत बुमराह झे. व गो. कमिन्स ०२, चेतेश्वर पुजारा झे. पेन गो. कमिन्स ००, विराट कोहली झे. ग्रीन गो. कमिन्स ०४, अजिंक्य रहाणे झे. पेन गो. हेजलवूड ००, हनुमा विहारी झे. पेन गो. हेजलवूड ०८, रिद्धिमान साहा झे. लाबुशेन गो. हेजलवूड ०४, रविचंद्रन अश्विन झे. पेन गो. हेजलवूड ००, उमेश यादव नाबाद ०४, मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट ०१. अवांतर (००). एकूण २१.२ षटकांत सर्वबाद ३६. बाद क्रम : १-७, २-१५, ३-१५,     ४-१५, ५-१५, ६-१९, ७-२६,     ८-२६, ९-३१.गोलंदाजी : स्टार्क ६-३-७-०, कमिन्स १०.२-४-२१-४, हेजलवूड ५-३-८-५.ऑस्ट्रेलिया दुसरा डावमॅथ्यू वेड धावबाद ३३, जो बर्न्स     नाबाद ५१, मार्नस लाबुशेन झे. अग्रवाल गो. अश्विन ०६, स्टीव्हन स्मिथ नाबाद ०१. अवांतर (२). एकूण २१ षटकांत २ बाद ९३. बाद क्रम : १-७०, २-८२. गोलंदाजी : उमेश यादव ८-१-४९-०, बुमराह ७-१-२७-०, अश्विन ६-१-१६-१

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया